पश्चिम महाराष्ट्र

महापालिकेतील भ्रष्टाचारावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गप्प का?

भाजपाचे पक्षनेते नामदेव ढाके यांचा विरोधकांवर हल्ला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये भ्रष्टाचारावरून एवढा गोंधळ उडाला आहे. अनेक आरोप होत असतानाही पालिकेतील भ्रष्टाचाराबाबत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गप्प का? अशा शब्दात भाजपाचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी हल्ला चढविला आहे. एका बाजूला राष्ट्रवादीबाबत भ्रष्टाचारावरून प्रश्‍नचिन्ह उभे करतानाच त्यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराची जाहीर कबुलीच दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागात खरेदी करण्यात आलेल्या साहित्यामधील भ्रष्टाचारावरून सध्या वादळ निर्माण झाले आहे. अनेक निविदा प्रक्रियांमधील अनियमितता, अधिकाऱ्यांनी खात्यावर घेतलेली लाच, चायनिज साहित्याचा पुरवठा, स्पेशिफिकेशन बदलून पुरविण्यात आलेल्या मशीन, महिला अधिकाऱ्याला झालेली दमबाजी यासह अनेक विषयांवरून सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या अनागोंदी आणि भ्रष्टाचाराबाबत विरोधक शांत असताना भाजपाच्याच नगरसेवकांनीच आरोपांची राळ उठवून दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे वाभाडे निघण्यास सुरुवात झाली होती.

सत्ता आणि पक्ष बदनाम होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी घोषणा करतानाच भ्रष्ट निविदांची चौकशी करण्याचेही जाहीर केले होते. भ्रष्टाचारापासून स्वत:ला आणि पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर मंगळवारी ढाके यांनी या सर्व प्रकरणाबाबत प्रमुख विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादीचे नेते का गप्प आहेत? असा प्रश्‍न उपस्थित करत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि त्यांच्या भूमिकेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे.

महापालिकेतील या घडामोडींबाबत राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने कोणतीच भूमिका जाहीर न केल्यामुळे या पक्षातील नेत्यांचे ठेकेदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न ढाके यांनी केल्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. ढाके यांनी केलेल्या थेट आरोपामुळे संशयाच्या फेऱ्यात आता राष्ट्रवादी पक्ष आणि या पक्षाचे नेते आपल्यामुळे आता “ते’ काय भूमिका घेतात हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भ्रष्टाचाराची जाहीर कबुली
राष्ट्रवादीवर निशाणा साधण्याच्या नादात नामदेव ढाके यांनी महापालिकेत भ्रष्टाचार सुरू असल्याची जाहीर कबुलीच देऊन टाकली आहे. विशेष म्हणजे ज्या निविदांबाबत तसेच अधिकाऱ्यांबाबत आक्षेप आहेत त्याबाबतही त्यांनी जाहीर कबुली दिल्यामुळे आयुक्त आतातरी कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close