पश्चिम महाराष्ट्र

आषाढी एकादशी: आषाढी एकादशी- विठ्ठल भेटीसाठी पालख्या पंढरपुरात – all palkhi in pandharpur for ashadhi ekadashi

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘पंढरी वैकुंठ, रीते वाळवंट, दाटला से कंठ, पांडुरंगा’ या आर्त ओढीने आषाढी वारीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूहून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका मंगळवारी (३० जून) बसने पंढरपूरला मार्गस्थ झाल्या. निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल‘च्या नामघोषात वैष्णव दिंडी लालपरीतून रवाना झाली.

आळंदी येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे-पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या उपस्थितीत पादुका मार्गस्थ झाल्या. तत्पूर्वी, पहाटे श्रींना अभिषेक, दुग्ध आरती करण्यात आली. त्यानंतर कीर्तन, प्रवचन झाले. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांचा सत्कार करण्यात आला. पादुका पंढरीकडे मार्गस्थ होताना सोबत वीस मान्यवरांना नियमांचे पालन करण्यासह सामाजिक वावर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. खेडचे प्रांत संजय तेली यांनी मार्गदर्शन केले.

विविधरंगी फुलांनी सजविलेल्या बसमध्ये दिंडीकऱ्यांसह पुजारी, चोपदार, मानकरी यांनी प्रवेश केला. बसचे संपूर्ण सॅनिटायझेशन करण्यात आले होते. मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. आजोळघर परिसरात निरोपासाठी नागरिक उपस्थित होते.

तुकोबांची पालखी ‘विठाई’तून रवाना

श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका नेणाऱ्या बसचे नामकरण ‘विठाई’ असे करण्यात आले होते. ही बस मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. त्यापूर्वी पहाटे विठ्ठल-रखुमाई मुख्य मंदिरात देहू देवस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर परंपरेनुसार काकडा आरती, महापूजा करण्यात आली. कीर्तन झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पार्थ पवार यांच्या उपस्थितीत आणि ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषात पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांनी तुकोबारायांच्या पादुका आपल्या डोईवर घेतल्या. टाळ मृदंगाच्या गजरात पादुका मुख्य मंदिरातून बाहेर आणण्यात आल्या. या वेळी उपस्थित भाविक पताका मिरवित आनंदाने बागडत होते.

महाद्वारासमोर विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट केलेल्या ‘विठाई’ बसमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. महिला भाविकांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. त्यानंतर पादुका घेऊन बस मार्गस्थ झाली. त्यानंतर अनगडशहा बाबा दर्गा येथे परंपरेनुसार पहिली आरती करण्यात आली. आरती होताना पादुका बसमध्येच ठेवण्यात आल्या होत्या.

देह असे घरी, मन वारी करी…

यंदा करोनामुळे पायी वारी करणे शक्य न झाल्यामुळे असंख्य वारकऱ्यांनी खंत व्यक्त केली. तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या. त्यामध्ये ‘क्षमा करी हरी, चुकली पायी वारी, संकट आले भारी, करोना रूपे’ आणि ‘देह असे घरी, मन करी वारी, सुनी ही पंढरी, दिसतसे,’ या रचना मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यातून पंढरीची आर्त ओढ स्पष्ट होते.

Source link

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close