देश विदेश

मोदी सरकार शेतकरीविरोधी नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यासाठीच ऐतिहासिक विधेयके संसदेत मंजुर करवून घेतली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होणार आहे. मोदी सरकार शेतकरी विरोधी निर्णय कधीही घेऊ शकत नाही. मात्र, विधेयकांना विरोध करताना राज्यसभेत जे काही घडले ते अत्यंत लाजिरवाणे होते, अशी खंत देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी रात्री पत्रकार परिषदेत केले.

कृषी सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजुर होताना काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी धुडगूस घातला. त्याविषयी केंद्र सरकारतर्फे पत्रकारपरिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, थावरचंद गेहलोत, मुख्तार आब्बास नकवी, प्रल्हाद जोशी आणि पियुष गोयल उपस्थित होते.

सभागृहाचे कामकाज चालविण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही असते. राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयकांवर चर्चा सुरू असताना जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणे होते. उपसभापतींच्या आसनाकडे धावून जाणे, त्यांच्यासमोर नियम पुस्तिका फाडणे, त्यांच्यासमोरील माईक तोडणे, टेबलवर चढणे, आरडाओरडा करणे, घोषणाबाजी करणे असे प्रकार संसदीय लोकशाहीला धक्का लावणारे आहेत. संसदीय इतिहासात आणि त्यातही राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात अशी लाजिरवाणी घटना प्रथमच घडली आहे. ज्यावेळी अशाप्रकारे संसदेमध्ये मर्यादाभंद होतो, तेव्हा लोकशाहीची अब्रू धोक्यात येते. राज्यसभेत आज घडलेल्या प्रकारामुळे अतिशय वाईट वाटल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

उपसभापतींसोबत हिंसक आचरण करणे अतिशय दुखद असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगतिले. ते म्हणाले, उपसभापती हरिवंश हे लोकशाही मूल्यांवर विश्वास असणारे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत असे वागणे, त्यांच्यावर आरोप करणे हे अतिशय गंभीर आहे. मात्र, विरोधकांचे आचरण आज संपूर्ण देशाने पाहिले आहे. आपल्या आतापर्यंतच्या संसदीय कारकिर्दीमध्ये असा प्रकार आपण प्रथमच पाहिला असल्याचेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.

बाजारसमित्या बंद होणार नाहीत

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या या विधेयकांविषयी विरोधी पक्ष जाणीवपूर्वक आपला स्वार्थ साधण्यासाठी दिशाभूल करीत आहेत. त्यासाठी किमान हमी भाव (एमएसपी) रद्द होईल, बाजारसमित्या (एपीएमसी) बंद केल्या जातील अशा अफवा पसरविण्यात येत आहेत. मात्र, आज मी पुन्हा एकदा ग्वाही देतो की एमएसपी रद्द होणार नाही आणि बाजारसमित्याही सुरूच राहतील. मोदी सरकार कधीही शेतकरीविरोधी धोरण आखणार नाही आणि शेतकरीविरोधी कायदे करणार नाही, याची ग्वाही मी देतो; कारण मी स्वत शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या समस्या मला ठाऊक आहेत. मोदी सरकारनेच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांनी विरोधकांच्या अफवांना बळी पडू नये, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

Source link

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close