इतरयुथ कट्टाशिक्षण

कॉमर्समधील करियरच्या संधी…

Spread the love

शाम धूत ( सी.ए.)
वाणिज्य शाखा म्हटलं की मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये, विशेषत: ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नाक मुरडण्याचे मोह टाळत नाही. कारण त्यांना या क्षेत्रातील संधींची माहिती नसते. म्हणून कॉमर्सकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी वळत नाही. या क्षेत्रामध्ये 12 वी नंतर वेगवेगळ्या करिअरच्या संधी उपलब्ध होत असतात. सध्या जागतिकरणामुळे पैशाचे महत्व वाढलेले आहेत. तसेच भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्विकारल्यामुळे आणि जास्तीत जास्त खाजगीकरण असल्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या कॉमर्समधील पदवी आणि पदविकांमुळे सहज शक्य आहेत. आजच्या मेट्रो सिटी वातावरणामुळे आणि जग एका क्लिकवर असल्यामुळे स्टॉक मार्केट, कॉर्पोरेट फायनान्स तसेच वेगवेगळ्या संस्थांमध्ये या शैक्षणिक पदवीनंतर प्रचंड मोठी मागणी आहे. अकाऊंटन्सी, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, ई-कॉमर्स, इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड टॅक्सेशन लॉज अशा वेगवेगळ्या संकल्पना व्यापार आणि वाणिज्य यांच्या माध्यमातून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शिस्तबध्द शिक्षणाच्या पदव्या व पदविका निर्माण करण्याची गरज शिक्षण क्षेत्रात वाटल्यामुळे तशा पदव्या आणि पदविकादेखील आज निर्माण झालेल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ही जगामध्ये एक अत्यंत जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे येथे विशेष पदवी आणि पदविका घेणार्‍या लोकांना अत्यंत मोठ्या प्रमाणात मागणी असते. वाणिज्य क्षेत्रामध्ये विस्तीर्ण व विविध कोर्सेस उपलब्ध आहेत.
1. बी.कॉम. – ही कॉमर्समधील एक पदवी असून 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी या पदवीसाठी पात्र असतात. या पदविचा कालावधी 3 वर्षांचा आहे. महाविद्यालयपरत्वे याची फिसदेखील वेगळी असते. साधारणपणे 5 ते 7 हजार एवढा खर्च प्रत्येक वर्षी अपेक्षित आहे. ही पदवी पूर्ण केल्यानंतर विविध व्यावसायिक पतसंस्था, बँका, खाजगी संस्था यांच्यामध्ये कनिष्ठ लेखापाल म्हणून नियुक्ती भेटू शकते. मुंबई, पुण्यामधील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये, कंपन्यांमध्ये लेखापालची अत्यंत आवश्यकता असते. तिथे बहुधा बी. कॉमच्या विद्यार्थ्यांनाच नेमले जाते.
2. बी. एम. एस. (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) – हीदेखील एक पदवी असून 3 वर्ष कालावधीची आहे. साधारणत: 10 ते 15 हजार एवढी वार्षिक फिस या पदवीसाठी लागू शकते. ही पदवी प्राप्त केल्यानंतर कनिष्ठ किंवा वरिष्ठ लेखापाल म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या व्यावसायिक तसेच सरकारी खात्यांमध्ये आजकाल मॅनेजमेंट कन्सल्ट म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
3. बी.बी. एस. (बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज) – ही 3 वर्षांची पदवी असून महाविद्यालय परत्वे 10 किंवा 15 हजार एवढे प्रति वर्ष शुल्क आकारून तीन वर्षाची पदवी पूर्ण करता येते. बर्‍याचशा महाविद्यालयांमध्ये आजकाल बी.बी.एस. उपलब्ध आहे. ही पदवी प्राप्त केल्यानंतर कनिष्ठ किंवा वरिष्ठ लेखापाल म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या व्यावसायिक तसेच सरकारी खात्यांमध्ये आजकाल मॅनेजमेंट कन्सल्ट म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
4. बी. बी. एम./ बी. बी. ए. (बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट/अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) – व्यवस्थापन आणि प्रशासनामधली अर्थशास्त्रातील / अकाऊंटमधील ही एक अत्यंत महत्वाची तीन वर्षांची पदवी असून ही पदवी एम. बी. ए. करू इच्छिणार्‍या मुलांसाठी एक वरदानच आहे. कारण या माध्यमातून व्यवसायाचे पृथ्थकरण, व्यवस्थापन, प्रशासकीय जबाबदार्‍या छान पध्दतीने पार पाडता येतात. या पदवीची शुल्क साधारणपणे 25 हजार ते 40 हजार महाविद्यालयपरत्वे असू शकते. ही पदवी पूर्ण केल्यानंतर मॅनेजमेंट कन्सल्ट म्हणून विविध व्यावसायिक संस्था/कंपनी मध्ये नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
5. एम. कॉम. (मास्टर ऑफ कॉमर्स) – साधारणपणे बी. कॉम. नंतर उमेदवार एम. कॉम कडे वळत असतो. हा पदव्युत्तर 2 वर्षांचा अभ्यासक्रम असून आजकाल बी.बी.एम., बी.बी.एस. अशा वेगवेगळ्या पदव्या संपादन करूनदेखील या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे वळता येते. सीनिअर अकाऊंटट म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये करियर निर्माण करता येते. कारण यामध्ये कॉस्ट अकाऊंट, मॅनेजमेंट अकाऊंट, फायनल अकाऊंट इत्यादी वेगवेगळ्या पृथ्थकरणीय अकाऊंटचे शिक्षण असल्यामुळे विविध आर्थिक देवाण-घेवाण करणार्‍या संस्थांमध्ये एम. कॉम. झालेल्या विद्यार्थ्यांची खूप मागणी आहेत.
6. डी.टी.एल. (डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ) – डी. टी. एल. हा 1 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम असून पदवी झाल्यानंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. या पदविकेचीदेखील महाविद्यालयपरत्वे वेगवेगळी फिस असते. साधारणत: 10 हजारांच्या आतच याची फिस असते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर खाजगी टॅक्स कंन्सलटंट म्हणून काम करता येते. यामधून भरपूर अर्थाजन होवू शकते. आजकाल डी.टी.एल. ची मागणी वेगवेगळ्या आर्थिक संस्था तसेच खाजगी कंपन्यांमध्ये वाढलेली आहे.
7. एम. बी. ए. (मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) – हा एक पदव्युत्तर अभ्यासक्रम असून याचा कालावधी 2 वर्षांचा आहे. बी.बी.एम., बी.बी.एस, बी.बी.ए., करून या अभ्यासक्रमाकडे वळल्यास खाजगी कंपन्यांमध्ये याचे जास्त महत्व आहे. आजकाल इंजिनिअरींग झाल्यानंतर देखील काही विद्यार्थी एम.बी. ए. करत असतात. याची फिस 30 हजार किंवा त्याच्या आजूबाजूला असून हा 2 वर्ष कालावधी असलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. एम.बी.ए. केल्यानंतर वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट एक्झीकेटिव्ह म्हणून भरपूर संधी उपलब्ध आहेत. एम.बी.ए. केल्यानंतर मॅनेजमेंट, मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिर्सोस इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करता येते. अर्थार्जन मात्र कंपनीपरत्वे व महाविद्यालपरत्वे भिन्न असू शकते. जेवढ्या प्रतिष्ठित महाविद्यालयातून एम.बी.ए. पूर्ण केले तेवढ्या संधीसुध्दा जास्त असू शकतात.
8. सी.ए. (चार्टर्ड अकाऊंटन्सी) – भारतातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या गेलेली चार्टर्ड अकाऊंटन्सी ही एक पदवी आहे. आयसीएआय (इंन्स्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडिया) या अ‍ॅटॉनॉमस बॉडीकडून ही परीक्षा घेतली जाते. याचा कालावधी 4 वर्षांचा असून तीन वेगवेगळ्या पातळींमध्ये ही परीक्षा हेात असते. त्याला सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल अशा तीन पातळ्या असतात. परीक्षा घेणार्‍या संस्थेला साधारणपणे 30 हजार एवढी फिस भरावी लागते. या परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी वर्गसुध्दा चालतात. यातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे प्रात्यक्षिक प्रशिक्षण (प्रॅक्टीकल ट्रेनिंग) होय. हे प्रशिक्षण कार्यरत असलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट यांच्याकडे 42 महिन्यांचे म्हणजे 3 वर्ष 6 महीने एवढ्या कालावधीचे प्रात्यक्षिक करावे लागते. या पदवीनंतर अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या व्यावसायिक संस्थांमध्ये, औद्योगिक कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट एक्झीकेटीव्ह म्हणून काम करता येते. एजीएम, बीजीएम, जीएम इत्यादी वेगवेगळ्या आर्थिक पदांवरती काम करता येते. तसेच गुंतवणूक सल्लागार, बँक, वित्तसंस्था अशा विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी भेटू शकते. सी.ए. आपली स्वत:ची खाजगी प्रॅक्टीसदेखील करू शकतात.
9. सी. एस. (कंपनी सेक्रेटरी) – हा एक व्यावसायिक कोर्स असून या अभ्यासक्रमावरची परीक्षा आयसीएस (इंन्स्टीट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी) नावाची संस्था घेत असते. या कोर्सचा कालावधी 3 वर्ष असून ही साधारणपणे पदवी परीक्षाच समजली जाते. ही पदविका पूर्ण केल्यानंतर कंपनीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करता येते. बहुदा बी.कॉम. करून सी.एस. केल्यानंतर प्रतिष्ठित औद्योगिक संस्थांमध्ये याची मागणी जास्त आहेत.
10 सी.डब्ल्यु.ए. (कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क्स अकाऊंटंट) – हाही व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. याचा कालावधी 3 वर्षांचा आहे. इन्स्टीट्युट ऑफ कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क्स अकाऊंटंटच्या माध्यमातून याची परीक्षा देता येते. वेगवेगळ्या कंपनीमध्ये, चित्रपट क्षेत्र, तसेच खाजगी प्रॅक्टीस अशा वेगवेगळ्या संधी आयसीडब्ल्युए च्या माध्यमातून उपलब्ध होतात. हा कोर्सदेखील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जातो.
11. सी.एफ.ए. (चार्टर्ड फायनान्सीयल अ‍ॅनालिस्ट प्रोग्रॅम) – या कोर्सचा कालावधी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे. काही ठिकाणी 3 वर्षांचा तर काही ठिकाणी 4 वर्षांचा आहेत. बर्‍याच वेळा बी. काम. किंवा एम. कॉम. झाल्यानंतर या कोर्सकडे विद्यार्थी वळत असतात. गुंतवणूक सल्लागार, तसेच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सल्लागार, ब्रोकिंग फर्ममध्ये सल्लागार म्हणून भरपूर संधी उपलब्ध आहेत.
12. इतर संधी – वाणिज्य शाखेच्याविद्यार्थ्यांना भारतासारख्या प्रगतशील राष्ट्रात व इतर प्रगत राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच वेगवेगळे कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. फायनान्स, बँकिंग, मार्केटिंग यातील वेगवेगळ्या पदविका आणि पदव्या उपलब्ध आहेत. बँकिंग, इश्युरंन्स, फायनान्स यासारख्या वित्तीय संस्थांमध्ये सरळ सेवांतर्गत भरती होत असते. अशा प्रकारे वाणिज्य शाखेची निवड करून आपले भविष्य विद्यार्थी घडवू शकतात.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: