पश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

प्लास्टिक बंदी आता काळाची गरज – नंदकिशोर गांधी

Spread the love

 महाराष्ट्र विश्व न्युज,(पुणे ) – ग्रामीण भागात प्रामुख्याने जणजागृती करून कायमस्वरूपी प्लास्टिक बंदी करणे काळाची गरज आहे, असे मत पर्यावरण तज्ञ नंदकिशोर गांधी यांनी जिल्हा परिषद कार्यशाळेत व्यक्त केले. गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे झालेल्या प्लास्टिक व थर्माकोल बंदी कार्यशाळेत ते बोलत होते.
गेली १५ वर्षापासून महाराष्ट्रात विविध योजनांद्वारे घनकचरा व सांडपाणी या विषयावर काम सुरू आहे. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही प्लास्टिक वापर वाढल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी २३ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून महाराष्ट्रात प्लास्टिक व थर्माकोल बंदी घातली. या अधिसूचनेबद्दल लोकांना माहिती व्हावी तसेच अंमलबजावणी यंत्रणेला अधिसूचनेच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करणेसाठी जिल्हयातील जिल्हा परिषद पुणे सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य, शिक्षण अधिकारी- कर्मचारी व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक अशा दीड हजार लोकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी गांधी यांनी प्लास्टीक वापराबाबत कायदे – नियम, त्याचे तोटे, पर्यावरणावरील दुष्परिणाम, प्लास्टिकला पर्याय या विषयांवर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले – ‘प्लास्टिकचे दुष्परिणामही समोर येत आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या भयंकर गंभीर समस्या वाढलेल्या आहेत. अनेकांना कोणते प्लास्टिक विकत घ्यावे व कोणते नाही याची सुध्दा माहिती नसते. आता आपणाला ती माहिती प्रत्येकाला सांगावी लागेल, शासनाच्या अधिसुचनेची अंमलबजावणी शंभर टक्के यशस्वी करावी लागेल. प्लास्टिक हे आपल्या आयुष्याचा इतका सहज भाग झाला आहे की, त्याची वेगळी माहिती करून घ्यावी असे कोणालाही वाटत नाही. लोकांना या वैशिष्टयपुर्ण प्लास्टिक पदार्थांची काळी बाजू समजावून द्यावी लागेल. आज वस्तूंच्या वेष्टनापासून ते अगदी सहजासहजी निकामी न होणाऱ्या  ह्रदयाच्या कृत्रिम झडपांपर्यंत प्लास्टिक पदार्थांचा उपयोग होत आहे. पण तरीही मुळ वैज्ञानिक दृष्टीकोणाला धक्का पोहचणार नाही, याची काळजी घेवून प्लास्टिकचा वापर केला पाहिजे.’
यावेळी उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्लास्टिक व थर्माकोल बंदी अधिसुचना अंमलबजावणी बाबत माहिती दिली. त्याआधी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी प्रास्ताविक व कार्यशाळेचे महत्व सांगितले. ते म्हणाले आता किराणा दुकानातील प्लास्टिक पिशव्या, विविध कार्यक्रमात वापरात येणाऱ्या थर्माकोल व प्लास्टिक पत्रावळया, भाजीपाला व फळे आदी वस्तू घेताना वापरत असलेल्या पिशव्यांवर आपणाला बंदी घालावी लागेल. ग्रामीण भागात याची कार्यवाही करण्याची संपुर्ण जबाबदारी गट विकास अधिकारी व ग्रामसेवक यांची असेल. त्यांनी आता यामध्ये पुढाकार घेवून दररोज प्रत्येक गावात नियोजनबध्द काम करायला हवे. त्यांनतर प्लास्टिक बंदीवर आधारित विविध लघु चित्रपट दाखविण्यात आले. कार्यशाळेत यावेळी पर्यावरण तज्ञ डॉ. अभिजीत घोरपडे यांनी प्लास्टिकला पर्याय काय काय आहेत यावर मार्गदर्शन केले. कापडी पिशव्या, सुपारीच्या झाडापासून व वडाच्या झाडाच्या पानांपासून तयार होणाऱ्या पत्रावळयांचा वापर, पुनर्वापर होणारे प्लास्टिक आदीबाबत यावेळी घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सागर मित्र संस्थेचे प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. कार्यशाळा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना २३ मार्च २०१८ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेच्या प्रती तसेच नंदकिशोर गांधी यांच्या माहिती पुस्तकाचे वाटप करण्यात आले. कार्यशाळेला उपस्थित मान्यवरांचे आभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांनी मानले तर कार्यशाळेचे सुत्रसंचलन आशिष जराड यांनी केले.

Tags

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Close
%d bloggers like this: