पश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्वाचा

कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांचे प्रतिपादन; मुकुल माधव फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) –  “शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातुन येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना कृषीचे उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात.

अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुकुल माधव फाउंडेशनसारख्या संस्था पुढे येऊन या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावत आहेत, ही सुखावह बाब आहे. विद्यार्थ्यानीही मिळालेल्या मदतीचा योग्य विनियोग करून पूर्ण क्षमतेने अभ्यास करत आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी विश्वनाथा यांनी केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या यांच्या वतीने कृषी विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या एकूण ५९ गरजू विद्यार्थ्यांना ‘मोहिनी प्रल्हाद छाब्रिया शिष्यवृत्ती’ दिली जाणार आहे. त्यापैकी शिवाजीनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्नित कृषी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

१२ मुलांच्या शिष्यवृत्तीचा सहा लाखांचा धनादेश फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी डॉ. विश्वनाथा यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. ए. एल. फरांदे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. एन. रसाळ, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, वनाधिकारी डॉ. लक्ष्मण मूर्ती, प्रा. वाय. सी. साळे, फाउंडेशनचे बबलू मोकळे आदी उपस्थित होते.

पदवीसाठी ३६, पदव्युत्तर पदवीसाठी २०, तर पीएचडी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दरवर्षी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. पुणे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, कऱ्हाड, धुळे येथील कृषी महाविद्यालयातील ५९ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.

डॉ. के. पी. विश्वनाथा म्हणाले, “मुकुल माधव फाउंडेशनने दिलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांसह पदवी घ्यावी. त्यापुढील शिक्षण विद्यार्थ्यांनी स्वावलंबनातून केले पाहिजे. त्यासाठी विद्यापीठामार्फत ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ), सिनिअर रिसर्च फेलो (एसआरएफ) योजनांचा लाभ घ्यावा. आपल्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या दानशूर व्यक्तींकडून आदर्श घेत आपणही पुढील पिढीला हातभार लावण्याची वृत्ती जोपासली पाहिजे.”

रितू छाब्रिया म्हणाल्या, “शेतकरी आणि फिनोलेक्सचे जुने नाते आहे. शेतकऱ्यांसाठी शेती उत्पादने बनवत आहोतच. पण त्याबरोबर त्यांच्या मुलांच्या शिक्षणालाही हातभार लागावा, यासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे.

या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी त्याची मदत होणार आहे. त्यातून चांगले आणि सक्षम अधिकारी तयार होतील. ग्रामीण भागातही शेतकरी आणि महिलांसाठी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहोत. महिलांचे सक्षमीकरणासाठी आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी नेहमी काम सुरु राहील.”

डॉ. ए. एल. फरांदे म्हणाले, “सामाजिक बांधिलकी जपणारे खूप कमी लोक आहेत. मुकूल माधव फाउंडेशनने सगळ्याच क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणाला हातभार लागत असून, यातून चांगले शेतकरी संशोधक, अधिकारी निर्माण होतील.

संस्थेने कोंकण भागातील विद्यार्थ्यांचीही जबाबदारी घेतली असून, तेथेही चांगले काम सुरु आहे. समाजातील गरजू व्यक्तींपर्यंत संस्था पोहचत असून निधीचा योग्य विनियोग होत आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या शिष्यवृत्तीचे योग्य प्रकारे वापर करून शिक्षण क्षेत्रात नाव करणे गरजेचे आहे.”

यावेळी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी निलेश इंगोले आणि दीक्षा तेली यांनी शिष्यवृत्ती योजना सुरु केल्याबद्दल मुकुल माधव फाउंडेशनचे आभार व्यक्त केले. सुत्रसंचलन डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. आभार डॉ. यशवंत साळे यांनी मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: