इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसंपादकीय

‘स्टार्स फोरम’ची दहावी राष्ट्रीय परिषद ६-७ डिसेंबर रोजी पुण्यात

'कौशल्य विकासातून ग्रामीण रोजगार निर्मिती' विषयावर होणार चर्चा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – स्टार्स फोरम (स्किल्स ट्रेनिंग फॉर एडव्हान्समेंट इन रुरल सोसायटीज) या फोरम तर्फे ‘ ग्रामीण कौशल्याच्या विकासाचे पुनरावलोकन – धोरण व सराव’ या विषयावर दहावी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून ‘बाएफ ‘ संस्था ( वारजे, पुणे) येथे ६-७ डिसेंबर रोजी होणाऱ्या या परिषदेला देशविदेशातून शिक्षण ,रोजगार ,ग्रामविकास क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्टार्स फोरम चे अध्यक्ष डॉ योगेश कुलकर्णी , कार्यकारी संचालक चैतन्य नाडकर्णी यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली .

६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता परिषदेचे उद्घाटन होणार आहे.उद्घाटनपर पहिल्या सत्रात ‘ग्रामीण भारतातील कौशल्ये प्रशिक्षणाचे प्रयोग ‘ या विषयावर चर्चासत्र होणार आहे .’बाएफ’ संस्थेचे अध्यक्ष डॉ गिरीश सोहनी ,’युवा परिवर्तन ‘ संस्थेच्या सह संस्थापक मृणालिनी खेर, राजीव गांधी सायन्स -टेक्नोलॉजी कमिशनचे सचिव अनिल मणेकर,’कॉर्ड ‘ संस्थेच्या संचालक डॉ .क्षमा म्हेत्रे या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत .

या परिषदेच्या दोन दिवसातील चर्चासत्रात आर .श्रीधर,लक्ष्मीकांत माळवदकर,डॉ रघुराम दास ,प्रवीण महाजन ,वैभव काळे ,सुभाष देशपांडे,अजय कुमार ,डॉ संदीप देशमुख ,पंकज सिंह ,डॉ दिनेश अवस्थी ,अमीर सुलतान ,कुलभूषण बिरनाळे,नरेंद्र कराळे,डॉ सुधा कोठारी ,डॉ विवेक सावंत ,डॉ उन्नत पंडित ,रोहित सरोज ,हेमंत गाडगीळ ,रिटा सेनगुप्ता सहभागी होणार आहेत .

मागील दहा वर्षात स्टार्स फोरमने अनेक राष्ट्रीय परिषदा, औद्योगिक कौशल्य विकासपर प्रशिक्षण कार्यक्रम आयॊजित केले आहेत. सर्व समाजेवी संस्थांना एकाच व्यासपीठावर आणणे व विविध कौशल्यांची देवाण घेवाण करणे हा या फोरमचा उद्देश आहे. आजपर्यंत देशभरातून १०० हुन अधिक संस्था या प्रयत्नात सहभागी झाल्या आहेत.

ग्राम विकास व उपजीविका या क्षेत्रात काम करणा-या संस्थानी, एकत्र प्रयत्न करुन ग्रामीण रोजगार निर्मितीकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच या विषयातील विचार व कल्पना यांची देवाण- घेवाण करण्यासाठी STARS Forum (Skills Training for Advancement in Rural Societies)- स्टार्स फोरम हि संस्था २०१० साली स्थापन झाली.

ग्रामीण व निमशहरी लोकांमध्ये असलेल्या कौशल्याचा योग्य वापर करून त्यांच्याकरता उपजीविका निर्माण करणा-या विविध स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणणे व त्यांना समान व्यासपीठ मिळवून देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी स्टार्स फोरम आपली दहावी वार्षिक राष्ट्रीय परिषद पुणे येथील ‘बाएफ’ संस्थेमध्ये ६ व ७ डिसेम्बर रोजी आयोजित करत आहे.

कारखान्यामधून जास्त उत्पादन तयार करणे व त्याचे विपणन यामुळे केँद्रित पध्दतीची उत्पादन पध्दती विकसित झाली आहे. मात्र, नवीन तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती यामुळे विकेंद्रित उत्पादन किंवा गाव पातळीवर उत्पादन आता शक्य होत आहे. तसेच नवीन काळात गाव पातळीवर अनेक उद्योग संधी निर्माण होत आहेत.

त्यामुळे गरजू विद्यार्थी, महिला, असंघटीत युवक- युवती ,भूमिहीन शेतकरी जे चांगली उपजीविका मिळण्यापासून दूर आहेत; अशा लोकांना एकत्रित आणून स्थानिक व्यावसायिक कौशल्यांच्या आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा लघु उद्योग सुरु करण्यास मदत करणे यासाठी स्टार्स फोरम प्रयत्न करत आहे.

अधिक माहिती :

कौशल्य विकासातून रोजगार मिळवून देण्याचे बहुतांश प्रयत्न हे शहरी भाग व संघटीत क्षेत्रातील उद्योग या पुरते मर्यादित आहेत. काही संस्था प्रशिक्षण देऊन त्यानंतर अर्धकुशल नोकरी मिळवून देणे या वर भर देतात. सध्या शहरी भागात अनेक समाजसेवी संस्था (NGOs) कार्यरत आहेत. मात्र गावात राहून सक्षम रोजगार निर्मिती करता येईल असे प्रयत्न फारच कमी संस्था व संघटना करत आहेत.

गावात रोजगार निर्माण करता आला, तर गावातील युवकांना किमान चांगले राहणीमान मिळवता येते. गावातील विकास कामातून रोजगार मिळाला तर सर्वाँगिण ग्राम विकास पण साधता येतो. मात्र गावात राहून स्वत:चा व गावाचा विकास करता येईल असा विश्वास समाजात निर्माण होणे आवश्यक आहे.

नव्या दशकात नोकरी आणि व्यावसायिक कौशल्यांचे संकट भारतासमोर आहे. अंदाजे १.६ कोटी भारतीय तरुण दरवर्षी “रोजगार क्षम” वयामध्ये सामील होतात. ग्रामीण भागातून रोजगारासाठी दरवर्षी साधारण १५० दशलक्ष लोक शहरी भागात स्थलांतर करतात. मात्र त्यांच्यासाठी रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नाहीत.

स्टार्स फोरमच्या कार्यक्रमांमुळे झालेल्या देवाण घेवाणीचे अनेक सकारात्मक परिणाम दिसत आहेत. उदाहरणार्थ, स्टार्स फोरम च्या माध्यमातून अझोला शेती तंत्रज्ञान विविध राज्यात पसरवले गेले. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशामधील अनेक शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना अझोला लागवडीचे प्रशिक्षण दिले.

या प्रशिक्षणामुळे हे तंत्रज्ञान भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी, कुक्कुटपालन आणि दुग्धशाळांना हस्तांतरित करण्यात मदत झाली ज्यामुळे अधिक उत्पादन व अधिक उत्पन्न मिळते.

स्टार्स फोरम ने त्यांच्या संलग्न संस्थांना CSR निधी मिळवून देण्यात मदत केली आहे . या फोरम ने अनेक व्यवसायिक संस्थांना दुर्गम भागातील समाजसेवी संस्था शोधून त्यांना CSR निधी मिळवून देण्यास मदत केली. करण्यात मोलाचे कार्य केले आहे.

स्टार्स फोरमच्या माध्यमातून अनेक उद्योजकता विकास कार्यशाळा चालवल्या आहेत. उदाहरणार्थ, व्यवसाय प्रस्ताव बनवणे, उद्योग संधी शोधणे इत्यादी. विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था कर्मचारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या प्रशिक्षणांचा मोठा फायदा झाला आहे.

या अंतर्गत आत्तापर्यंत सिदबर्डी -हिमाचल प्रदेश, पुणे- महाराष्ट्र तसेच केरळ, गुजरात अश्या विविध ठिकाणी यशस्वीरीत्या व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरे करण्यात आली आहेत .

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: