इतरउत्तर महाराष्ट्रगुन्हेविश्वनाशिकराज्यसंपादकीय

बँकेतून बोलतोय सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(नाशिक) – शहरातील आरबीएल बँकेच्या 32 ग्राहकांना सुमारे 16 लाख रूपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. क्रेडिट कार्ड खरेदी केल्यानंतर कार्ड एक्टिव्हेशनच्या नावाने ग्राहकांना कॉल आले होते.

10 दिवसांत 32 ग्राहकांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आली असून तक्रारदारांची संख्या वाढत आहे. सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून बँकेचे सर्व्हर हॅक झाल्याचा संशय ग्राहकांना आहे. सायबर गुन्हे रोखण्याचं मोठं आव्हान पोलीसांसमोर उभं राहिलं आहे.

आरबीएल अर्थातच रत्नाकर बँक लिमिटेड. ही बँक नाशिकमध्ये सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरते आहे. ह्याला कारण ठरतंय ते म्हणजे या बँकेच्या 32 ग्राहकांची झालेली ऑनलाईन फसवणूक. नाशिकच्या सायबर पोलिस ठाण्यात या 32 लोकांनी तक्रार दाखल केली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत जातोय.

या ग्राहकांनी क्रेडिट कार्ड खरेदी केले त्यानंतर बँकेच्या वेबसाईटवर जाऊन पिन रिसेट केला. यानंतर त्यांना आरबीएल बँकेतून बोलत असल्याचा कॉल आला विशेष म्हणजे समोरील महिलेने या ग्राहकांना त्यांचं नाव विशेष म्हणजे कार्ड नंबरही सांगत त्यांच्याकडून जन्मतारीख तसेच बाकी माहिती गोळा केली.

काही वेळातच त्यांच्या अकाउंटमधून पैसे गायब झाले. कोणाच्या अकाऊंटमधून 30 हजार तर कोणाच्या दीड लाख. हे एक मोठं रॅकेट असल्याचा संशय ग्राहकांकडून व्यक्त केला जात आहे. बँकेचे लोक डेटा लीक करत असावेत किंवा बँकेचे सर्व्हर हॅक झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

या सर्व प्रकारामुळे बँकेत खळबळ उडालीय. बँकेचे अधिकारी कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाही. या सर्व घटनेचा आम्ही देखील वरिष्ठ पातळीवर तपास करत असल्याचं त्याच्याकडून सांगण्यात येतंय. तर दुसरीकडे बँकेचे सर्व्हर हॅक झाले असावे किंवा डेटा लीक होत असावा असा संशय ग्राहकांकडून व्यक्त केला जात असून पोलिस देखील या दिशेने तपास करतायत.

नाशिकमध्ये खरं तर रोज ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार समोर येताय. कधी ओएलएक्स वरून वस्तू खरेदीच्या नावाखाली पैसे उकळले जातात तर कधी गुगल पे वरुन एखादा व्यवहार करताना अकाउंटमधून पैसे गायब होतात. सायबर गुन्हेगार तसेच हॅकर्स हे कशाप्रकारे हॅक करतात हे आम्ही तज्ञाकडून जाणून घेतलय.

दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे नाशिक पोलीस करतायत काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. गुन्हे करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचं दिसून येत आहे. पोलीसांसमोरही हे गुन्हे रोखण्याच मोठं आवाहन उभं राहिल्याचं बघायला मिळतंय.

धक्कादायक म्हणजे महिलांना ऑनलाईन ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचंही अनेकवेळा समोर आलय. स्वतःच्या चुकांमुळेच नागरिक हॅकर्सच्या जाळ्यात अडकत असल्याचं पोलीस तपासात समोर येतय. अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देणे, ओटीपी शेअर करणे टाळावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येतय.

ऑनलाईन व्यवहार करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं असते. मात्र, नागरिकांकडून ती घेतली जात नाही आणि ते हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे कुठलाही ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहा आणि काहीतरी चुकीचं घडतंय असा संशय आल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: