आरोग्यइतरऔरंगाबादमराठवाडाराज्य

वैजापुरात डेंग्यूने घेतला सहा वर्षीय चिमुकलीचा बळी

शहरासह ग्रामीण भागात आळताहेत डेंग्यूचे रुग्ण ; आतापर्यंत गेले पाच बळी

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(वैजापूर-औरंगाबाद) – शहरासह तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून डेंग्यूने एका सहा वर्षीय चिमुकलीचा बळी घेतला. डेंग्यूमुळे मुलांचे मरणसञ सुरूच असून गेल्या दोन महिन्यातील हा पाचवा बळी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण तापाने फणफणले असताना आरोग्य विभागाकडून उपाययोजना माञ शून्य आहे. पाच जणांचा बळी गेल्यानंतरही सुस्तावलेल्या आरोग्य विभागाला जाग यायला तयार नाही. परी जितेंद्र डोंगरे ( 6 वर्षे ) असे मृत मुलीचे नाव आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नवजीवन काॅलनीतील रहिवासी जितेंद्र डोंगरे यांची सहा वर्षीय मुलगी परी डोंगरे दोन दिवसांपूर्वी तापाने फणफणली होती. वैद्यकीय तपासणीनंतर परीला डेंग्यू झाल्याचे निदान झाले.

त्यामुळे तिला तात्काळ पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान परी हिचे 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले. पुणे येथून रुग्णवाहिकेव्दारे तिचे शव वैजापूर येथे आणून पहाटेच्या सुमारास तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

परी ही आईवडिलांना एकुलती एक मुलगी होती. शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूने एकापाठोपाठ एक बळी जात असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. साधारणतः दोन महिन्यापूर्वीच शहरातील शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी अजय सतिषसिंग राजपूत या 20 वर्षीय युवकाचा डेंग्यूने बळी घेतला.

याशिवाय तालुक्यातील तलवाडा येथेही एकापाठोपाठ तीन मुलींचा डेंग्यूने बळी घेतला. या तिन्हीही मुली सात वर्षांच्या आतील होत्या. त्यानंतर परीचाही डेंग्यूने बळी घेतला. विशेषतः तलवाड्यासारख्या ग्रामीण भागात तिघींची डेंग्यूने बळी घेतल्याचे घटना उघडकीस आली.

याबाबत दस्तूरखुद्द आरोग्य विभाग बेखबर होता. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी काय करतात? असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून डेंग्यूचे रुग्ण तापाने फणफणले असून खाजगी रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. डोके दुखणे, ताप येणे, उलटय़ा होणे व हातपाय दुखणे. अशी डेंग्यूची मुख्य लक्षणे आहेत.

विशेषतः ही लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना आरोग्य विभाग मात्र सुस्तावलेला दिसत आहे. आरोग्य विभागाकडून डेंग्यूबाबत जनजागरण अथवा उपाययोजना होतांना दिसत नाही.

डेंग्यूने आतापर्यंत पाच जणांचा बळी घेतला. एवढे बळी जाऊनही सुस्तावलेला आरोग्य विभाग कधी जागा होणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रे नावापुरतीच

तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु ही केंद्रे नावापुरतीच उरली असून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी मुख्यालयी राहत नसून जिल्हा व तालुकास्तरावर राहून आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. कामचुकार अधिकाऱ्यांच्या कारभारावर संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: