मुंबईमुंबईराज्य

पोळीभाजी केंद्रांतून भाज्या हद्दपार

Spread the love

मुंबई – राज्यात अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याने मुंबई-ठाण्याला होणारी भाज्यांची आवक कमी होऊन दरांत वाढ झाली आहे. भाज्यांच्या दरांनी उसळी घेतल्याने आता पोळीभाजी केंद्रांतील जेवणाच्या मेन्यूतून भाज्या हद्दपार झाल्याचे चित्र आहे. उपाहारगृहांमधील भाज्यांशी संबंधित पदार्थाच्या दरांतही वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे भाज्यांची ३० ते ४० टक्क्यांनी आवक घटली आहे. तसेच वाशी आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेहमीपेक्षा भाज्यांच्या पुरवठा कमी होत आहे. आवक घटल्याने भाज्यांच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. या महागाईमुळे पोळी-भाजी केंद्रामध्ये आता भाज्या हद्दपार झाल्या आहेत.

पोळी-भाजी केंद्रामध्ये ६० ते ७५ रुपयांमध्ये जेवणाची थाळी मिळते. त्यामध्ये दोन भाज्या, चपाती, भात, डाळ आणि पापड असे जेवण दिले जाते. तर भाजीसाठी ३० रुपये घेतले जातात. त्यामध्ये मेथी, पालक, शेपू, भेंडी, गवार, फ्लॉवर अशा भाज्यांचा प्रामुख्याने समावेश असतो. मात्र, भाज्या परवडेनाशा झाल्यामुळे केंद्रचालक जेवणाच्या मेन्यूत कडधान्यांच्या उसळी किंवा बटाटय़ाच्या भाजीचा समावेश करत आहेत. उपाहारगृहामध्ये पालेभाजी जेवणात दिली जात असली तरी ग्राहकांना जेवणात पालेभाजी देणे परवडत नसल्याचे उपाहारगृह चालकांनी सांगितले. भाज्यांच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भाजी ठेवत नाही, असे ठाण्यातील एका पोळी-भाजी केंद्र चालकांनी सांगितले. तर, साई ध्यान हे उपाहारगृह चालविणाऱ्या आकाश गुप्ता यांनीही हेच कारण सांगितले. भाज्यांचे दर वाढल्याने आता जेवणाच्या दरात वाढ करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. कांदा गायब ठाणे शहरातील उपाहारगृह चालकांना पालेभाज्या महागल्याचा फटका बसला आहे. भाज्यांसोबतच कांद्याचे दर वाढले असून किरकोळ बाजारात ७५ ते ८० रुपये किलो कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे उपाहारगृह चालकांनी ग्राहकांना जेवणासोबत आता कांदा देणे बंद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: