इतरठाणेप्रशासनमुंबईराज्य

पत्री पुल मार्चपर्यंत सेवेत; तिसरा पुल जूनमध्ये

गर्डर कामाच्या पाहाणीसाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची हैदराबाद-भेट

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(मुंबई) – कल्याणकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या पत्री पुलाचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होऊन मार्च महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

या पुलाच्या ओपन वेब गर्डरचे काम सध्या हैदराबाद येथे वेगाने प्रगतिपथावर असून ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. याचसोबत तिसऱ्या पुलासाठी आवश्यक असलेल्या गर्डरच्या कामालाही सुरुवात करण्यात आल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. मार्चपासून या परिसरातील वाहतूक सुरळीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना पत्री पुल सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने पाडण्यात आल्यानंतर त्या जागी नव्या पुलाचे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय एमएसआरडीसीचे तत्कालीन मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आणि या वर्षीच्या १ एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

तसेच, या पुलाला समांतर असा आणखी एक तिसरा पुलही राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मंजूर केला असून त्याच्याही कामाला सुरुवात झाली आहे. पायलिंग आणि खांब उभारण्याचे काम प्रत्यक्ष जागेवर वेगाने सुरू असून पुलाचा अत्यंत महत्त्वाचा, केंद्रीय भाग असलेल्या गर्डरचे काम हैदराबाद येथी ग्लोबल स्टील कंपनी येथे सुरू आहे.

या कामाची पाहाणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी हैदराबाद येथे जाऊन केली. त्यांच्यासमवेत एमएसआरडीसीचे मुख्य अभियंते एस. व्ही. सोनटक्के, कार्यकारी अभियंते नितीन बोरोले, पत्री पुलाचे काम करणाऱ्या ब्रिज इंजिनीअरिंग या कंत्राटदार कंपनीचे दीपक मंगल, ग्लोबल स्टीलचे ऋषी अगरवाल, साकेत शर्मा आदी उपस्थित होते.

कामाची पाहाणी करून गर्डरच्या कामाच्या प्रगतीबद्दल डॉ. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. पुलाच्या प्रत्यक्ष जागी कल्याण दिशेला आठ पैकी सहा खांब उभे राहिले असून डोंबिवली दिशेला सहा पैकी चार खांबांचे काम पूर्ण झाले आहे.

फेब्रुवारी अखेरपर्यंत ही कामे आणि अप्रोच रस्त्याचे काम पूर्ण होईल आणि मग ओपन वेब गर्डर टाकण्यात येऊन मार्च महिन्यात हा पुल प्रवासी वाहतुकीसाठी खुला होईल, असे डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येकी पाच तासांचे दोन मेगाब्लॉक देण्यात येणार आहेत.

याच पुलाला समांतर आणखी एका नव्या (तिसऱ्या) पुलाला खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे एमएसआरडीसीने मंजुरी दिली असून त्याच्याही कामाला सुरुवात झाली आहे. या पुलाच्या गर्डरचे कामही हैदराबाद येथे सुरू असून हा तिसरा पुल जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: