इतरचंद्रपूरराज्यविदर्भसंपादकीय

वेगळा विदर्भ हवा की नको?

Spread the love

निखील खानोरकर,(महाराष्ट्र विश्व न्यूज,चंद्रपूर) – विकासाचा असमतोल दूर करायचा असेल, तर लहान राज्यांच्या निर्मितीचा विचार व्हायला हवा. महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांत विदर्भाचा विकास किती प्रमाणात झाला याचा जर आढावा घेतला, तर विकासापासून अजूनही विदर्भ उपेक्षितच आहे, हे ध्यानात येते.

विकासाचा अनुशेष कमी न होता तो दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्व संपत्तीने विपुल असलेल्या विदर्भामध्ये विकासाची गती मंद आहे. विदर्भात खनिज संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. एकट्या विदर्भात वीजनिर्मितीची चार केंद्रे आहेत.

पैनगंगा, वैनगंगासारख्या बारमाही वाहणार्‍या नद्या आहेत. नागपूर शहराचा विचार केला, तर विधानभवन, रिझर्व्ह बँक, आकाशवाणी ही विदर्भाच्या जमेची बाजू आहे. असे असूनसुद्धा विदर्भाचा ५० वर्षांत विकास का झालेला नाही, याचाही विचार व्हायला हवा. आता आता कुठे नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलायला लागलेला आहे.

परंतु या ठिकाणी सुरू होत असलेल्या प्रकल्पांना पाहिजे तसा प्रतिसाद नाही. बुटीबोरी वसाहतीचे सुरू असलेले काम याचे ज्वलंत उदाहरण होय. राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केलेला आहे. विदर्भाला नेहमीच सापत्न वागणूक मिळते. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात उपयोग न होता तो विदर्भाबाहेरच जास्त होतो.

मोठे सिंचन प्रकल्प अजूनही आम्ही विदर्भात उभारू शकलेलो नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकर्‍यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून रहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकर्‍यांना बसत असल्यामुळे व त्यांना हवी ती मदत मिळत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडलेला आहे. आज सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात आहेत.

खेड्यापाड्यांचा कायापालट अजूनही झालेला नाही. अनेक विदर्भाचे प्रकल्प अडून पडलेले आहेत. त्यामुळे विदर्भाच्या वाट्याला उपेक्षितांचे जिणे आलेले आहे. विदर्भ वेगळा करण्यासाठी आजवर अनेक आंदोलने करण्यात आली, परंतु त्या आंदोलनांना यश प्राप्त झाले नाही. आंध्र प्रदेशातून तेलंगणा वेगळे राज्य निर्मितीच्या दृष्टीने केंद्र सरकारने दाखविलेली अनुकूलता लक्षात घेता वेगळ्या विदर्भाची मागणी यापुढे जोर धरू शकते.

महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करा म्हणजे विकास होईल, अशी मागणी हिवाळी अधिवेशनात करण्यात आली. तसा प्रस्ताव देण्याचासुद्धा विचार सुरू आहे; परंतु राजकीय पक्षांचे एकमत होत नाही. विदर्भ वेगळा हवा की नको यासाठी आपली क्षमता चाचपडून पाहण्याची गरज आहे. आजवर ज्या प्रतिनिधींना आपण निवडून दिले, त्यांना जाब विचारण्याची ही वेळ आहे.

विदर्भाचा अनुशेष वाढविण्यासाठी जबाबदार कोण? ज्यांच्यावर आपण इतकी वर्षे विश्वास टाकला त्यापैकी किती जणांनी विदर्भाचा मुद्दा शासन दरबारी लावून धरला? वैदर्भीय नेत्यांचा करंटेपणाच विदर्भाच्या मागासपणाला जबाबदार आहे. प. महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा विकास किती, याची आकडेवारी शासनाने जाहीर करावी.

त्यामुळे विकासाचा लेखाजोखाच आपल्यासमोर येईल. वेगळ्या तेलंगणाच्या मागणीचा सर्व व्यासपीठांवर, तसेच रस्त्यांवरही पाठपुरावा करणार्‍या टी. चंद्रशेखरराव यांनी संसदेच्या अधिवेशनाचा मुहूर्त साधून उपोषण करण्याचा निर्धार केला. या त्यांच्या प्रयत्नांची तातडीने दखल काँग्रेसने घेतली. यावरून हा नेता किती प्रभावी आहे हे सिद्ध होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातून बाजूला सारल्या गेले. तेलंगणा मुद्यावर त्यांनी सोबत केली, परंतु काँग्रेसने त्यांची दखल घेतली नाही. आता उपोषणाला बसल्याबरोबर तातडीने दखल घेण्याचे काँग्रेस श्रेष्ठींनी ठरविले.

एका उपोषणात जर राज्य वेगळे होऊ शकते, तर मग आजतागायत विदर्भातील नेत्यांना हे यश प्राप्त का झाले नाही? ‘ वारे शेर आ गया शेर’ म्हणून ज्यांना विदर्भातील जनतेने डोक्यावर घेतले त्या विदर्भवीराला १९७७-७८ मध्ये इंदिराजींनी काँग्रेस पक्षात सामील करून घेतले. गेल्या कित्येक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरून आहे; परंतु या मागणीला उचलून का धरण्यात आले नाही? याचासुद्धा विचार व्हायला हवा.

रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता जांबुवंतरावांव्यतिरिक्त कोणीही नाही. इतर जे नेते विदर्भाचे तुणतुणे वाजवित आहेत, त्यांचा स्वतःचा विकास इतका झालेला आहे की, त्यांनी या मुद्याकडे लक्ष देणे व बोलणे बंद केलेले आहे. विदर्भातील जे नेते आहेत, ते मुंबईच्या रंगात इतके रममाण झालेले आहेत की, महाराष्ट्राच्या राजधानीत गेल्यानंतर विदर्भाबद्दल ते एक शब्दसुद्धा बोलत नाहीत.

शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये मिळवून त्यांनी फक्त स्वतःचा अनुशेष भरून काढलेला आहे. या अनुशेष भरण्याच्या मोहापायी एका नेत्याकडे सद्यःस्थितीत दहा ते पंधरा शैक्षणिक महाविद्यालये, शाळा आहेत. याच माध्यमातून तिजोरी भरण्याचे काम सुरू आहे.

विदर्भ वेगळा हवा म्हणून फक्त देखावा करायचा व मुंबई, दिल्लीला जाऊन एकाच ताटात जेवणाचा आनंद घ्यायचा व विदर्भातील जनतेला या मुद्यावर कसे मूर्ख बनविता येईल याचे फंडे ठरवायचे, एवढेच काम फक्त आजवर या नेत्यांनी केलेले आहे. वास्तविक आता जनतेने वेगळ्या विदर्भाची भाषा बोलायला हवी.

विदर्भ वेगळा हवा की नको हे जनतेने ठरवायला हवे! विदर्भ वेगळा का हवा व विदर्भ वेगळा का नको, यावर जनतेच्या प्रतिक्रिया उमटायला हव्यात. नेते म्हणतात म्हणून हो म्हणायचे व नाही म्हणतात म्हणून ना म्हणायचे हे आता कुठेतरी थांबायला हवे. स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल, तर स्वतःला जागृत व्हावेच लागेल.

शेतकर्‍यांच्या इतक्या आत्महत्या झाल्या, तरी आपण अद्यापही जागे झालेलो नाहीत, ही विदर्भाच्या जनतेची शोकांतिका आहे. नागपूरचाच विकास जर कासवगतीने सुरू आहे, तर इतर शहरांचे व खेड्यांचे काय? विदर्भ वेगळा हवा ही मागणी जुनीच आहे. या मागणीमध्ये चैतन्य निर्माण करण्याची मानसिकता विदर्भातील जनतेने ठेवावी. म्हणजे विदर्भाच्या विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी तो मैलाचा दगड ठरेल!

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: