Uncategorized

शिवसेनेमुळे जिल्ह्याचा विकास की जिल्हा भकास?

Spread the love

एकनाथ गोधम, (परभणी) – १९८९ पासून परभणी तालुक्यासह जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य आहे. प्रत्येक निवडणुकीत परभणी लोकसभा व विधानसभा ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. परंतु दिशाहीन नेतृत्व आणि आशाहीन जनतेमुळे या जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम समजल्या जाणार्‍या या जिल्ह्याला चांगली पार्श्‍वभूमी असतानाही पाण्याचा अभाव, विजेचा लपंडाव, रस्त्यांची दुरावस्था, उद्योग-व्यवसायांबाबत नकारात्मकता या सर्वांमुळे हा जिल्हा दिवसेंदिवस भकास होत चालला आहे.

जिल्हयामध्ये गोदावरी, दुधना, पूर्णा या प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांतून भरपूर पाणी उपलब्ध होते. त्याचबरोबर जायकवाडीचा डावा कालवा याच जिल्ह्यातून वाहतो. परंतु पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे हा जिल्हा दुष्काळाच्या छायेत वावरताना पाहावयास मिळतो. सिंचनासाठी शासनाकडून अनेक योजना अंमलात आणल्या, जलसंधारण, पाणी आडवा पाणी जिरवा, पाणलोट विकास कार्यक्रम याबरोबरच आता जलयुक्त शिवार अशा योजना परभणी जिल्ह्यात राबवूनही सिंचनात वाढ झाली नाही. सातत्याने पडत असलेला दुष्काळाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. याला जबाबदार प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधीही आहेत. या जिल्ह्यावर अगोदर काँग्रेसचे वर्चस्व होते. परंतु काँग्रेस पक्षाने या जिल्ह्यासाठी भरीव काम न केल्याने जनतेने त्यांना नाकारून शिवसेनेला पसंती दिली. परंतु शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनीही जनतेच्या प्रश्‍नांकडे म्हणावे तसे लक्ष न दिल्याने या जिल्ह्याचा विकास खुंटला आहे.

जिल्ह्याचे खासदार वीज प्रश्‍नावरून सातत्याने आंदोलन करीत आले आहेत. परंतु या आंदोलनाचा शेतकर्‍यांना फायदा झाला की नाही याकडे त्यांनी कधीच लक्ष पुरविले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना वीज वेळेवर मिळत नाही. परिणामी शेतात पाणी असूनही शेतकर्‍यांना याचा उपयोग घेता येत नाही. यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न घटत चालले आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परभणी जिल्ह्याच्या जनतेने मोठा संघर्ष करून कृषी विद्यापीठ परभणीला मिळवून घेतले. परंतु या विद्यापीठातून ना रोजगार निर्मिती झाली ना शेतकर्‍यांच्या जीवनमान सुधारले. या सर्व परिस्थितीला केवळ आणि केवळ लोकप्रतिनिधी अर्थात आमदार व खासदार हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.

प्रशासनावर वचक नसल्याने प्रशासनातील अधिकारी मनमानी करून आपला हेका पुढे चालवित आले आहेत. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींची स्वार्थी वृत्ती विकासाला अडथळा निर्माण करीत आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जनतेपुढे भावनिक मूद्दे आणि विकास समोर करून विजय मिळवायचा आणि पुर्वीचाच कित्ता पुढे चालवायचा हे सातत्याने चालत आले आहे. तेच लोकप्रतिनिधी, तेच अधिकारी आणि त्याच त्या योजना सतत राबविल्या जात आहेत. जिल्ह्यात उद्योगधंदे निर्माण करण्याची मोठी संधी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील रस्ते सुधारावे यासाठी गावातील लोक संघर्ष करत आले आहेत. परंतु तोही प्रश्‍न आतापर्यंत सुटलेला नाही. शिवसेनेकडून सातत्याने आम्ही विरोधक असल्याची ओरड केली जायची. परंतु गेल्या ५ वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असूनही लोकप्रतिनिधी मात्र त्याचा जनतेच्या फायद्यासाठी उपयोग करून घेताना दिसत नाहीत हे या जिल्ह्याचे दुर्देव आहे.

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Close
%d bloggers like this: