आरोग्यइतरनागपूरप्रशासनराज्यविदर्भ

उपराजधानीत डेंग्यूग्रस्तांमध्ये निम्म्याहून अधिक मुले!

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(नागपूर) – उपराजधानीत डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. प्रत्येक दहाव्या घरात एक संशयित रुग्ण आहे. १ जानेवारी ते ७ नोव्हेंबर २०१९ दरम्यान डेंग्यूचे ४५२ रुग्ण आढळलेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे रुग्ण ३३ टक्क्यांनी जास्त आहेत. त्यात पुरुष रुग्ण अधिक असून निम्म्याहून अधिक मुलांना या आजाराने ग्रासले आहे.

उपराजधानीत गेल्यावर्षी डेंग्यूने चांगलेच थैमान घातले होते. त्यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची दमछाक झाली होती. कमी कर्मचाऱ्यांमुळे तातडीने उपाय करता न आल्याने डेंग्यूग्रस्तांची संख्या ३४१ झाली होती. हा कटू अनुभव लक्षात घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने २०१९ मध्ये डेंग्यू नियंत्रणासाठी जास्त प्रभावी उपाययोजना करणे अपेक्षित होते. परंतु फवारणीसह इतर आवश्यक कामाकडे दुर्लक्ष झाल्याने यंदा रुग्ण ३३ टक्क्यांनी वाढून रुग्णसंख्या ४५२ वर पोहचली आहे. यात २५६ पुरुष तर १९६ महिला रुग्णांचा समावेश आहे.

महापालिकेच्या हद्दीत आढळलेल्या डेंग्यूग्रस्तात पाच वर्षांखालील ४७ बालकांचा समावेश आहे. येथे सहा ते चौदा वर्षे वयोगटातील १११ मुले, पंधरा ते चोवीस वर्षे वयोगटातीलही १५०, पंचावन्नच्या वर वयोगटातील १३ जणांना हा आजार असल्याचे महापालिकेच्या नोंदीतून पुढे आले आहे.

पालिकेतील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही, तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर पालिकेकडून डेंग्यूवर नियंत्रणासाठी सर्वत्र कीटकनाशक फवारणी, जनजागृतीसह सर्व दवाखान्यात आवश्यक औषध साठा उपलब्ध केल्याचे सांगत लवकर त्यावर नियंत्रण मिळण्याची आशा व्यक्त केली.

खुल्या भूखंडावर डासांचे ‘कारखाने’!

नागपूरच्या आतील काही वस्त्यांसह गोधनी, दाभा आणि शहरालगतच्या अनेक वस्त्यांमधील मोठय़ा प्रमाणावर भूखंड रिकामे पडलेले आहेत. पैकी काहींवर पावसाचे पाणी साचले आहे. त्यातून दरुगधी येत असून तेथील पाण्यात डास उत्पत्तीचे कारखाने तयार झाले आहे. येथील डासांसह आजारावर महापालिका कसे नियंत्रण करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिकेला अनेकवेळा जनता दरबारात खुल्या भूखंडांवर कचऱ्यासह पाणी तुंबून शेजारच्यांना त्रास होत असल्यास संबंधित प्लॉटधारकांवर कारवाईच्या सूचना केल्या होत्या. निदान या पद्धतीचे उपाय येथे करण्याची गरज नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

‘त्या’ रुग्णालयांवर कारवाई कधी?

डेंग्यू हा नोटीफाईड आजार आहे. शहरातील शासकीय वा खासगी रुग्णालयांत रुग्ण आढळताच त्याची त्वरित माहिती महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाला देणे संबंधित रुग्णालयाला बंधनकारक आहे. परंतु आजही काही रुग्णालयांकडून ही माहिती दिली जात नाही. या विषयावर प्रत्येक वर्षी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संबंधित रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात कारवाई होणार केव्हा? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

शहरातील डेंग्यूची स्थिती १ जानेवारी ते ७ नोव्हेंबर २०१९

वयोगट पुरुष महिला एकूण

० ते ५ २२ २५ ४७

६ ते १४ ६५ ४६ १११

१५ ते २४ ९६ ५४ १५०

२५ ते ३४ ४२ ४३ ८५

३५ ते ४४ १७ १४ ३१

४५ ते ५४ ०७ ०८ १५

५५+ ०७ ०६ १३

एकूण २५६ १९६ ४५२

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: