इतरउत्तर महाराष्ट्रनाशिकराज्यसंपादकीय

पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत मारली उडी, ती वाचली पण तो बुडाला

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(नाशिक) –  नाशिकमधील इगतपुरी तालुक्यामधील घोटी खुर्द गावामध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. पाय घसरून विहिरीमध्ये पडलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी विहिरित उडी घेतलेल्या २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी (३ नोव्हेंबर) सकाळी दहाच्या सुमार ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार घोटी खुर्द गावातील भाऊसाहेब रोंगटे या तरुणाचा काही दिवसापूर्वीच सुवर्णा या तरुणीशी विवाह झाला होता. आई, वडील, भाऊ आणि हे दोघे पती पत्नी असे सर्वजण एकत्र राहत होते. नुकतेच घरात लग्नकार्य आटोपल्याने सर्वजण पुन्हा शेतीच्या कामाला लागले होते. रविवारी सकाळी घरातील सर्व मंडळी भातशेतीच्या कामासाठी गेली होती. भाऊसाहेबही शेतात जाण्यासाठी तयारी करत होता.

त्यावेळी सुवर्णा ही विहिरिवर पाणी भरण्यासाठी गेली असता पाय घसरुन ती विहिरित पडली. सुवर्णा विहिरित पडल्याने आजूबाजूच्या लोकांनी आरडा ओरड सुरु केला. त्यामुळे भाऊसाहेब विहिरिकडे धावला तेव्हा त्याला सुवर्णाच विहिरित पडल्याचे समजले. पुढचा मागचा विचार न करता तिला वाचवण्यासाठी त्याने विहिरित उडी घेतली. मात्र त्यालाच पोहता येत नसल्याने तो पाण्यामध्ये बुडू लागला.

दोघांनाही गावकऱ्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने विहिरिबाहेर काढले. गावकऱ्यांना दोघांनाही एस एम बी टी रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी भाऊसाहेबला मृत घोषित केले. सुवर्णावर उपचार सुरु आहेत. पत्नीला वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता विहिरित उडी मारणाऱ्या भाऊसाहेबच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. सोमवारी भाऊसाहेबवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: