उत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामुंबईरणधुमाळीराज्यविदर्भ

बसपाच्या तुलनेत ‘वंचित’च्या झोळीत भरभरून मते

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (ब्युरो रिपोर्ट) – दलित-मुस्लीम-बहुजनांची मोट बांधणाऱ्या आणि कधीकाळी विदर्भात दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या बहुजन समाज पक्षाची विदर्भातील ताकद टप्प्याटप्प्याने कमी होत असून दुसरीकडे वंचितच्या मतांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र मतदानाच्या आकडेवारीवरून पुढे येत आहे.

दोन दशकांपूर्वी भाजप व काँग्रेस या पारंपरिक पक्षानंतर सर्वाधिक मते घेणारा तिसरा प्रमुख पक्ष म्हणून बसपा विदर्भात पुढे आला होता. ‘कॅडर व्होट’ या पक्षाची ताकद होती. रिपाइंच्या विविध गटांमुळे नाराज असलेला तरुण दलित मतदार हा बसपाकडे वळला होता. दलितांसह बहुजनांची साथही लाभली होती. परंतु कालांतराने पक्षाची घसरण सुरू झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही विदर्भात पक्षाची कामगिरी समाधानकारक नव्हती आणि आताच्या विधानसभा निवडणुकीतही मोजकेच मतदारसंघ सोडले तर पक्षाची छाप दिसून आली नाही. खुद्द पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांचा उत्तर नागपूर या राखीव मतदारसंघात पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सभा घेतल्यावरही दारुण पराभव झाला.

विदर्भातील ६२ मतदारसंघाचा विचार केला तर पक्षाला साडेतीन ते चार लाखाच्या घरात एकूण मते मिळाली आहेत. कारंजा लाड (४१ हजार), उमरेड (१८,५००), उत्तर नागपूर (२३३३३) चा अपवाद सोडला तर इतर ठिकाणी पक्षाची कामगिरी निराशाजनक आहे. २०१४ च्या निवडणुकीत उत्तर नागपूर व उमरेड या दोन मतदारसंघात बसपा दुसऱ्या स्थानी होता.

दुसरीकडे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची मतसंख्या लोकसभेच्या तुलनेत या निवडणुकीत चांगलीच कमी झाली असली तरी बसपाच्या तुलनेत ती अधिक आहे. विदर्भात सरासरी साडेसहा लाख मते या पक्षाने घेतली. त्यापैकी पश्चिम विदर्भातील मतांची संख्या निम्मी आहे.

अकोला पूर्व (७५,७५२), मूर्तीजापूर (५७६१७,) रिसोड (३४४७५), वाशीम (५२४६४), सिंदखेड राजा ( (३९८७५), ज.जामोद (२९९८५), आकोट (४१,३२६), बाळापूर (५०५५५), साकोली (३४४३६) या मतदारसंघात वंचितने घेतलेली मते उल्लेखनीय ठरली.

काँग्रेस-भाजपची वंचितला साथ – शेवडे

काँग्रेस व भाजपसाठी बसपा वाढणे हे धोकादायक असल्याने या प्रमुख पक्षांनी वंचितला ताकद देणे सुरू केले. मात्र ही बाब लक्षात आल्यावर मतदार वंचितपासून दूर चालला आहे. त्यांच्या मतसंख्येत लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत घट झाली आहे. या निवडणुकीत वंचितचा फटका बसपाला बसला हे खरे आहे. पण लवकरच आम्ही पुन्हा नव्याने झेप घेऊ.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: