इतरदातापश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्यसंपादकीय

शाही अभ्यंगस्नान, फराळाच्या आस्वादाने ‘त्यांचा’ही दीपोत्सव झाला आनंदमय

माजी उपमहापौर आबा बागुल, अमित बागुल मित्र परिवाराचा उपक्रम

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) – रांगोळ्यांचा थाट, मांडलेला पाट, सुगंधी तेल-उटण्यांचा सुवास, औक्षणाचे ताट, गोडाचा घास आणि त्यावर चढलेला नव्या कपड्यांचा साज या साऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव मिळाल्याने ‘त्यांचा’ही दीपोत्सव आनंदमय झाला. शाही अभ्यंगस्नान आणि मनसोक्त फराळाचा आनंद घेताना ही मुले भारावून गेली.

निमित्त होते, पदपथ-सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसाठी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल यांनी आयोजित केलेल्या ‘शाही अभ्यंगस्नाना’चे! नामदार गोखले रस्त्यावरील गुडलक चौकात झालेल्या या अनोख्या उपक्रमाने पदपथावर राहणाऱ्या मुलांमुलींची शनिवारची सकाळ सुखद ठरली.

खेळण्या-बागडण्याचे आणि शिकण्याचे वय असतानाही परिस्थितीने पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजची सकाळ रोजगारासाठीच उजाडते. ना दसरा ना दिवाळी असे खडतर जीवन जगणाऱ्या या मुलांना आपल्याप्रमाणेच दिवाळीचा आनंद लुटता यावा, यासाठी बागुल पिता-पुत्र आणि मित्रपरिवाराने गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे.

शाही अभ्यंगस्नानानंतर या मुलांना नवे कपडे, फराळ आणि फटाके अशी मेजवानी मिळाल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर या आनंदमय सोहळ्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

कार्यकर्त्यांकडून परिसराची स्वछता करून येथे रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. त्यावर पाट मांडून प्रत्येक मुलाला उटणे लावून स्नान घालण्यात आले. त्यानंतर औक्षण करून, नवे कपडे आणि फराळ देण्यात आला.

आबा बागुल, जयश्री बागुल, अमित बागुल, हर्षदा बागुल, दीपा बागुल, स्वरा बागुल, श्रेया बागुल, सागर बागुल, अभिषेक बागुल, हेमंत बागुल आणि समस्त बागुल कुटुंबियांसह कार्यकर्त्याकडून या मुलांना सुवासिक तेल-उटणे लावून मंगलमय वातारणात झालेला अभ्यंगस्नानाचा हा सोहळा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता आणि नागरिकही त्यात सहभागी होत होते.

या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते जयेश कासट, इम्तियाज तांबोळी, सागर आरोळे, अँड चंद्रशेखर पिंगळे, धनंजय कांबळे, गोरख मरळ, महेश ढवळे, योगेश निकाळजे, पप्पू देवकर, हबीद शेख, बाबालाल पोळके, प्रकाश तारू, नितीन गोरे, सुरेश कांबळे, राहुल जगताप आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संयोजक अमित बागुल म्हणाले, “आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहोत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थितीने पदपथावर राहणाऱ्या आणि पोटाची खळगी भरण्यासाठी शिकण्या-खेळण्याच्या वयात सिग्नलवर फुले किंवा अन्य वस्तू विकणाऱ्या या मुलांना दिवाळीचा आनंद मिळावा, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवित असतो. त्याबरोबरच वर्षभर विधायक उपक्रम राबविले जातात.”

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: