इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसाहित्य

लडाखचे लोकप्रिय युवानेते जम्यांग नामग्याल यांची भावना

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे लडाखचे लोकप्रिय युवानेते जम्यांग नामग्याल यांना राष्ट्रउभारणीतील योगदानाबद्दल 'सूर्यदत्ता नॅशनल इंटिग्रेशन अवार्ड-२०१९' प्रदान

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पुणे) – “पुणेकरांनी मला भरभरून दिले आहे. लडाख आणि पुणे मैत्री यापुढे वृद्धिंगत होत राहील. सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनने राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार देऊन आजवर केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.

पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा पुरस्कार मिळाल्याने आनंदी असून, या पुरस्कारामुळे भविष्यात आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे,” अशी भावना लडाख येथील लोकप्रिय युवानेते आणि खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी व्यक्त केली.

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे राष्ट्रउभारणीतील योगदानाबद्दल ‘सूर्यदत्ता नॅशनल इंटिग्रेशन अवार्ड-२०१९’ देऊन नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आले. लडाखसह इतर भागात नामग्याल यांनी राष्ट्रविकासासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्याचा गौरव करण्यासाठी ‘सूर्यदत्ता’च्या वतीने नामग्याल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, उपरणे व पुणेरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

पुणे-लडाख मैत्रीपर्वाच्या उद्घाटनप्रसंगी नामग्याल पुण्यात आले होते. त्यावेळी ‘सूर्यदत्ता’च्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र साहित्यकला प्रसारिणीचे सचिन इटकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना ‘सूर्यदत्ता’च्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. ‘सूर्यदत्ता नॅशनल इंटिग्रेशन अवार्ड’ हा पुरस्कार समाजाच्या, देशाच्या विकासासाठी काम करणाऱ्या आणि त्या कामाचा आदर्श मागे ठेवणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो.

याआधी हा पुरस्कार ज्ञानेश्वर मुळे, अभिनेते गोविंद नामदेव, प्रिन्स मानवेंद्र सिंग गोहिल यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आलेला आहे.

तरुण आणि उत्साही खासदार असलेल्या नामग्याल यांनी जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर लोकसभेत केलेले भाषण गाजले. त्यांच्या भाषणाचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर मंत्र्यांनीही केले.

एका रात्रीत त्यांना जगभरात वेगळी ओळख मिळाली आणि ते स्टार झाले. ट्विटवर लाखो फॉलोअर्स झाले. ‘जेटीएन’ नावाने प्रसिद्ध असलेले नामग्याल मॅथो गावात जन्मले. जम्मू विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षकी पेशाचे काम केले. ऑल लडाख स्टुडंट्स असोसिएशन, जम्मूचे ते अध्यक्ष राहिले.

त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्ष जोडून घेत लेह मध्ये भाजप कार्यालय सचिव म्हणून काम सुरु केले. त्यानंतर खासदार थुपस्तान चेवांग यांचे खासगी सचिव म्हणूनही काम पहिले. २०१५ मध्ये लेहच्या मार्त्सेलांग मतदारसंघातून लडाख ऍटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली.

मॅथो गावात चार हजार झाडे लावण्यासह फाटख्यांवर बंदी, जमिनीचा प्रश्न असे काही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. तरुण चेअरमन आणि मुख्य कार्यकारी सदस्य म्हणून काम पहिले. नैसर्गिक शेतीसाठी दिशादर्शक धोरण देण्याचे काम त्यांनी केले आहे.

‘मिशन ऑरगॅनिक इनिशिएटिव्ह डेव्हलपमेंट’ (मोदी) हा प्रकल्प हाती घेत आरोग्य, पर्यावरण, सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्यासाठी काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच लडाख विद्यापीठ आणि दोन शासकीय महाविद्यालयाने लडाखमध्ये येऊ शकले. याशिवाय विकासाचे इतर अनेक प्रकल्प येथे सुरु आहेत.

२०१९ मध्ये नामग्याल यांनी खासदारकीची निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने जिंकली. गेल्या ७१ वर्षाच्या लढ्याला यश आले असून, लडाख हा भारताचा भाग आहे आणि तो केंद्रशासित प्रदेश झाला याचा आनंद असल्याचे सांगतानाच याआधीच्या सरकारने आमचे म्हणजे ऐकून घेतले नाही की, आम्हाला समजूनही घेतले नाही, अशी भावना त्यांनी मंडळी होती.

लेखक म्हणूनही नामग्याल यांची ओळख असून, त्यांनी ‘न्याम रतसोम गयी लेग स्काईज’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनकडून पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला.

शाळा, व्यवस्थापन, ट्रॅव्हल अँड टुरिजम, हॉटेल मॅनेजमेंट, मीडिया अँड मास कम्युनिकेशन, फ़ॅशन, इंटिरिअर डिझाईन, इव्हेन्ट मॅनेजमेंट, मल्टिमीडिया ग्राफिक्स अँड अनिमेशन, एव्हिएशन, हेल्थ अँड फिटनेस, सेल्फ डिफेन्स, ब्युटी अँड वेल्सनेस, व्होकेशनल अँड ऍडव्हान्स स्टडीज असलेल्या या संस्थेचा पुरस्कार जीवनात नवी दिशा देणारा ठरेल, असे नामग्याल यांनी म्हटले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: