इतरगुन्हेविश्वपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्य

पंचवीस हजारांसाठी पिस्तूल परवान्यात “ऑल इंडिया परमिट’असे खाडाखोड करणारा अधिकारी व व्यावसायिक यांना अटक !!

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पुणे ) –पिस्तूल परवाना देताना त्यामध्ये खाडाखोड करून थेट “ऑल इंडिया परमिट’ देत फसवणूक करणाऱ्या पोलीस आयुक्तालयातील कनिष्ठ लिपिकासह परवाना घेणाऱ्या व्यक्तीला गुन्हे शाखा युनिट-1 पथकाने अटक केली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ही कारवाई झाली आहे.

अमर पवार या कनिष्ठ लिपिकासह व् व्यावसायिक राजेंद्र भिंताडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. 25 हजारांच्या आर्थिक प्रलोभनापायी लिपिकाने हा प्रकार केला आहे. नियमानुसार, राज्यातील कोणत्याही अधिकारी अथवा पदाधिकाऱ्यास पिस्तुलाचा ऑल इंडिया परवाना देण्याचा अधिकार नाही; परंतु भिंताडे याला राज्यभरासाठी पिस्तूल परवाना मिळाल्यानंतर त्याने पवार याला 25 हजार रुपयांचे आमिष दाखवून हा परवाना “ऑल इंडिया’ करून घेतला. त्यासाठी पोलीस दफ्तरी आणि परवान्यात रेकॉर्डली खाडाखोड करून अधिकाऱ्यांची खोटी सही केली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भिंताडे याने पिस्तूल परवान्यासाठी अर्ज केला होता. यासाठी त्याने सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्याने केलेल्या अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी कर्मचारी पातळीवर झाली होती. परवाना दिल्यानंतर त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी नाहीत, याचा गैरफायदा घेऊन, परवाना तसेच रजिस्टरमध्ये खाडाखोड करण्यात आली. मात्र, त्या ठिकाणी नियुक्तीस असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला आणि दोघांचेही बिंग फुटले. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या निगराणीखाली चौकशीचे आदेश दिले होते.

पिस्तुलाचा ऑल इंडियाचा परवाना देण्याचा अधिकार केंद्रीय अधिकाऱ्यांना आहे. मात्र, कनिष्ठ लिपिकाने हा प्रकार प्रलोभनापायी खाडाखोड करून केला होता. याबाबत सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या देखरेखीखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये बनावट कागदपत्रे तयार करून खाडाखोड केल्याचे समोर आले. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच इतर कोणाचा सहभाग यामध्ये आहे का, याचा तपास सुरू आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: