इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसाहित्य

अभिरुची परिसराची शून्यकचरा निर्मितीकडे वाटचाल

ज्ञानेश्वर मोळक; 'सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल इन्सिलेटर'चे उद्घाटन

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) –  “शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे. आपल्याला स्वराज्य उभारणीत छत्रपतींचा मावळा होता आले नाही की स्वातंत्र्यलढ्यात योगदान देता आले नाही. पण आपण काळाची गरज आणि आपली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने स्वच्छतासैनिक आणि स्वच्छतामित्र बनावे,” असे आवाहन घनकचरा विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी पुणेकरांना केले. अभिरुची परिसराची वाटचाल शून्यकचरा निर्मितीकडे होत आहे, ही आनांदाची बाब आल्याचेही त्यांनी नमूद केले.

माय अर्थ फाउंडेशन व अभिरुची मॉलच्या संयुक्त विद्यमाने ‘कचरा व्यवस्थापन व निर्मूलन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात मोळक बोलत होते. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथे सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजल इन्सिलेटरचे उद्घाटनही करण्यात आले.

यावेळी पुनावाला वेस्ट मॅनेजमेंटचे मल्हार करवंदे, आरोग्य अधिकारी केतकी घाडगे, ‘बोला गारबेज’चे विशाल ठिगळे, ‘अभिरुची’चे यशोधन भिडे, कचरा व्यवस्थापन सल्लागार ललित राठी, माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, एन्व्हार्यमेंट क्लब ऑफ इंडियाचे निलेश इनामदार आदी उपस्थित होते. या कचऱ्याचे व्यवस्थापन ‘बोलाजी सर्व्हिसेस’ करणार आहे.

ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, “महापालिका आज अनेक उपक्रम राबवत आहे. शहरातील कचरा शहरातच जिरवण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. १४०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याने शहरालगतच्या परिसरात कचरा टाकण्याचे थांबले आहे. सोसायट्यांमध्ये कंपोस्ट खत, रेन वाटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. प्लास्टिकमुक्त शहरासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याकरिता सामाजिक प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाईचा पर्यायही वापरला जात आहे. कोणत्याही उपक्रमाच्या यशासाठी नागरी सहभाग महत्वाचा आहे.” कचरा उचलण्याची जबाबदारी पालिकेची आणि कचरा करण्याचे माझा हक्कच आहे, ही मानसिकता पुणेकरांनी बदलावी, असेही आवाहन मोळक यांनी केले.

मल्हार करवंदे म्हणाले, “शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी आदर पुनावाला फाउंडेशनच्या प्रयत्नातून काम सुरु आहे. असाच प्रयत्न इतर संस्थानी करावा. शहराच्या सुंदरतेची आणि पर्यावरण रक्षणासाठी काही कल्पना, तंत्रज्ञान असल्यास आदर पुनावाला फाउंडेशन त्यामध्ये सहकार्य करण्यास तयार आहे”.

कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या इतर मान्यवरांनीही आपली मते मांडली. अनंत घरत यांनी सूत्रसंचालन केले. यशोधन भिडे यांनी प्रास्ताविक केले. ललित राठी यांनी आभार मानले. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: