इतरगुन्हेविश्वपश्चिम महाराष्ट्रपुणेरणधुमाळीराज्य

अजित पवार यांचा मोबाईल नंबर हॅक

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पुणे) – राज्यामध्ये विधानसभा निवडणुकींची जोरदार तयारी सुरु आहे. निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या पैशांची देवाणघेवाण होत असते. त्यामुळेच या काळात पोलीस अनेक ठिकाणी धाडी घालताना दिसतात. अनेकदा उमेदवारी, प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसा फिरवला जातो. मात्र आता चक्क नेत्यांच्या नावाने फसवणुक केली जात असल्याचे प्रकार घडू लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या क्रमांक हॅक करुन त्यावरुन फोन करत पैशांची मागणी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नरेंद्र राणे यांना अजित पवारांच्या नावे फोन करुन गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या क्रमांकावरुन फोन आला होता तो अजित पवार यांचाच होता.

मात्र या कॉलबद्दल शंका निर्माण झाल्याने राणे यांनी पवारांच्या स्वकीयांना आणि नंतर खुद्द पावरांना कॉल बॅक केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अजित पवारांचा नंबर हॅक करुन त्यांच्या नावाने फोन केल्याचे उघड झाल्यानंतर राणेंनी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम पथकाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राणे यांना रविवारी सकाळी अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. या कॉलवर कुणाल नावाची व्यक्ती अजित पवारांच्या वतीने बोलत असल्याचे सांगण्यात आले. ‘दादा सध्या पुण्यामध्ये आहेत. त्यांना मुंबईमधील एका व्यक्तीला तातडीने मोठी रक्कम द्यायची आहे. या बँक खात्यावर त्वरित तुम्ही रक्कम भरण्याची व्यवस्था करा,’ असं या कुणाल नावाच्या व्यक्तीने राणेंना सांगितलं.

अजित पवारांच्या क्रमांकावरुन फोन आल्याने राणेंनी तात्काळ हो असं उत्तर देत पैशांची व्यवस्था कशी करता येईल याबद्दल विचार करण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ मागितला. मात्र निवडणुक काळात अचानक अजित पवारांच्या क्रमांकावरुन फोन करुन इतक्या मोठ्या प्रमाणात पैशाची व्यवस्था करण्यासंदर्भात विचारणा झाल्याने राणेंना शंका आली. राणे यांनी लगेच पवारांच्या स्वकीय सहाय्यकांना फोन लावला. त्यावेळी फोनवर सांगण्यात आल्याप्रमाणे अजित पवार पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले.

राणे यांनी फोन ठेवला आणि अर्ध्या तासाने स्वत:च अजित पवारांना पैशाची व्यवस्था होईल असं सांगण्यासाठी फोन केला. ‘काही वेळातच मी पैशांची व्यवस्था करतो,’ असं राणेंनी सांगितलं. राणेंच्या या वक्तव्याचा अर्थ पवारांना समजला नाही. त्यांनी कसले पैसे? असा सवाल केला तेव्हा राणेंनी अर्ध्या तासापूर्वी केलेल्या फोनचा उल्लेख केला. मात्र ‘मी तुम्हाला सकाळपासून फोन केलेलाच नाही. सकाळपासून फोन माझ्याकडेच आहे. तुम्ही कोणत्या पैशांसंदर्भात बोलत आहात?’ असा सवाल पवारांनी राणे यांना केला.पवारांना केलेल्या फोनवरुन सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर राणेंनी या फोनसंदर्भात पोलिसांकडे तक्रार केलीआहे. अजित पवारांचा मोबाइल हॅक करुन त्या माध्यमातून आर्थिक फसवणुक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. राणे यांनी आपल्या क्रमांकाचे सर्व फोन डिटेल्स पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणात पोलीस आता चौकशी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: