पश्चिम महाराष्ट्रपुणेमदतीचा हातराज्यसामाजिक संस्था

‘सर्वांसाठी घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पुण्यातील संस्थेचे महत्त्वपूर्ण पाऊल

परवडणा-या घरांच्या मागणी व पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी मॉडेल विकसित

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज ,(पुणे) – सर्वांसाठी घर हा विषय गेली काही वर्षे जोमाने चर्चेत असला, तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, तसेच अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी शहरांमध्ये चांगली आणि परवण्याजोगी घरे हे स्वप्न अजुनही त्या प्रमाणात साकार झालेले नाही. परवडणा-या घरांच्या श्रेणीतील सध्या उपलब्ध असलेली घरे मध्य शहरापासून दूर असतात, शिवाय अनेकदा हे गृहप्रकल्प उभारताना ग्राहकांच्या ख-या गरजांचा विचारच होत नाही. घरांची असलेली गरज आणि पुरवठा यात समन्वय साधून ग्राहकाला हवे तसे आणि खिशाला परवडणारे घर मिळावे, या उद्देशाने पुण्यातील ‘खोपा टेक्नाॉलॉजीज’ या स्टार्टअप संस्थेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

‘खोपा टेक्नॉलॉजीज’चे सहसंस्थापक मेघ घोलप यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेचे अन्य सहसंस्थापक देवदत्त बोराळकर, नितीन टाकळकर आणि डॉ. गीतांजली घोलप या वेळी उपस्थित होते.

संस्थेतर्फे पुण्यात ६ ठिकाणी तब्बल १२,००० कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून एक सर्वेक्षण केले आहे. ही सर्व कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प व मध्यम उत्पन्न गटातील आहेत. या व्यक्तींना कशी सदनिका हवी आहे, आपल्या गृहप्रकल्पात त्यांना कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत या प्रश्नांची उत्तरे संस्थेने या सर्वेक्षणातून जाणून घेतली असून नव्याने बांधली जाणारी परवडणारी घरे कशी असावीत हे अवघड समीकरण संस्थेने सोडवले आहे.

बांधकाम विकसक आणि गृहकर्जे देणा-या संस्थांबरोबरच सरकारलाही या संशोधनाचा उपयोग होणार आहे. ‘खोपा’तर्फे परवडणारी घरे बांधणारी मंडळी, घर ग्राहक आणि या व्यवहाराशी निगडित सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी एक मॉडेल (प्रारूप) तयार करण्यात आले असून परवडणारी घरे ही आदर्श स्वरूपाचीच असावीत यासाठी संस्था मार्गदर्शन करणार आहे.

हे सर्वेक्षण हडपसर-सोलापूर रस्ता, कात्रज-कोंढवा, वारजे-कोथरूड-पौड रस्ता, सिंहगड रस्ता, औंध-बाणेर-पाषाण आणि नगर रस्ता-विमाननगर या ६ ठिकाणी करण्यात आले आहे.

मेघ घोलप म्हणाले, ‘‘गृहबांधणी क्षेत्रात मागणी व पुरवठ्यामध्ये मोठी तफावत दिसून येते. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प व मध्यम उत्पन्न गटांसाठीच्या घरांच्या बाबतीत ही तफावत आणखीनच वाढते.

परिणामी या श्रेणीतील घरे ग्राहकांच्या फारशी पसंतीस उतरत नाहीत आणि ‘सर्वांसाठी घर’ ही संकल्पना यशस्वी ठरण्यात त्यामुळे अडथळे येतात. हा अडसर दूर होऊन खरोखरच सर्वांना स्वतःचे मनाजोगे घर मिळू शकावे यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. आमच्या प्रारुपाद्वारे जागा मालक, विकसक, वित्तसंस्था आणि सरकारी योजना या सर्व गोष्टी एका व्यासपीठावर आणून सर्वांसाठी घर या संकल्पनेचा एकात्मिक विचार करणे सोपे होणार आहे.

या सर्वेक्षणातून काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. परवडणारे घर म्हणजे केवळ शहरापासून दूर असलेले घर नव्हे, तर शहरातील विशिष्ट भाग, त्या भागाचे शहराच्या मध्य भागापासून असलेले अंतर, सदनिकेचा आकार आणि किंमत या सर्वच गोष्टी परवडणा-या घरांच्या श्रेणीसाठी महत्त्वाच्या असतात. पुण्याच्या प्रत्येक विस्तारित भागात सध्या किमान ५ लाख परवडणा-या घरांची गरज असून यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प व मध्यम उत्पन्न अशा सर्वच गटांचा समावेश आहे. या सर्वेक्षणानुसार ग्राहकांना पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतच साधारणतः ८ ते १० लाखांमध्ये ‘वन रुम किचन’, १५ ते २० लाखांत १ बीएचके आणि २५ ते ३० लाखांत २ बीएचके सदनिका उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये प्रतिमहा २५,००० रुपयांपर्यंत कमावणारी मंडळी, अल्प उत्पन्न गटात प्रतिमहा २५,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले लोक व मध्य उत्पन्न गटात ५०,०००-१ लाखापर्यंत प्रतिमहा उत्पन्न असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. यात संघटित क्षेत्रात काम करणा-या व निश्चित उत्पन्न असलेल्या ४१.६ टक्के व्यक्ती, तर असंघटित क्षेत्रात काम करणा-या- त्यातही स्वतःचा व्यवसाय करणा-या व निश्चित उत्पन्न नसलेल्या ५९.४ टक्के व्यक्ती आहेत. सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या बहुसंख्य व्यक्तींचे स्वतःचे घर नसल्यामुळे ही कुटुंबे भाड्याच्या घरात राहतात. सध्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) तुलनेत पुणे महानगरपालिकेच्याच हद्दीत घर घेण्यास पसंती देणा-यांची संख्या ४ पटीने अधिक आहे.

या विषयात ‘खोपा’च्या असलेल्या भूमिकेबद्दल बोराळकर म्हणाले, ‘‘ ‘सर्वांसाठी घर’ ही संकल्पन अधिक यशस्वी करण्यासाठी ‘खोपा’ ही संस्था मार्गदर्शकासारखे काम करेल. आमच्या सर्वेक्षणाच्या मदतीने आम्ही जागा मालक व विकसकांना योग्य प्रकारची परवडणारी घरे विकसित करण्यासाठी मदत करू. जागा मालक व विकसकांना लागणा-या वित्तपुरवठ्याबरोबरच सदनिका ग्राहकांना योग्य सरकारी योजनेचा कसा लाभ घेता येईल याचेही मार्गदर्शन आम्ही देऊ.’’

‘खोपा’चे हे मॉडेल वापरून लवकरच एक पथदर्शी प्रकल्प सुरू होत असल्याचे डॉ. गीतांजली घोलप यांनी सांगितले. सिंहगड रस्त्यावर धायरी येथे पुणे महापालिकेच्या हद्दीत २९० सदनिकांचा व या सर्वेक्षणातील निष्कर्षांशी पूर्णतः सुसंगत असा एक गृहप्रकल्प साकारतो आहे.

या गृहप्रकल्पातील सर्व सदनिका २ बीएचके असून अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांच्या तुलनेत या संपूर्णपणे अधिकृत अशा प्रकल्पातील सदनिकांच्या किमती तोडीस तोड असणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

‘खोपा टेक्नॉलॉजीज’विषयी-

शहरांमध्ये अल्प व मध्यम उत्पन्न गटांना परवडण्याजोगी घरे उपलब्ध करून देणे हा ‘खोपा टेक्नॉलॉजीज’चा हेतू आहे. नैतिक व तांत्रिक बाबींची पुरेपूर काळजी घेऊन केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प व मध्यम उत्पन्न घटकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणे हे संस्थेचे उद्दिष्ट्य आहे. ग्राहकांच्या मागण्या जाणून घेणे अर्थात ‘बायर बिहेविअरल रीसर्च’बरोबरच या विषयाशी संबंधित सर्व व्यक्तींमध्ये त्याविषयी जागृती निर्माण करणे आहे आणि अधिकाधिक मार्गदर्शन पुरवण्याचे काम संस्था करते.

‘खोपा’च्या संस्थापकांविषयी

देवदत्त बोराळकर- बोराळकर यांनी बांधकाम अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून त्यांना बांधकाम व त्यासाठीचा वित्तपुरवठा यातील तब्बल २९ वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. एका सहकारी बँकेचेही ते संचालक आहेत.

मेघ घोलप- मेघ यांनी एमबीए शाखेत पदवी संपादन केली असून त्यांना तंत्रज्ञान, बांधकामातील नावीन्यपूर्णता आणि ग्राहक सेवा या क्षेत्रातील १५ हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. स्टार्ट अप क्षेत्रातील नासकॉम पुरस्कारप्राप्त संघाचे नेतृत्तव त्यांनी केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी टाटा ट्रस्ट व इंडियन हाऊसिंग फेडरेशन यांच्या माध्यमातून पुण्यात राबविलेल्या जनजागृती मोहिमेचेही पुण्यातील नेतृत्त्व त्यांनी केले होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: