इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेप्रशासनरणधुमाळीराज्यसामाजिक

पुरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी – रामदास आठवले

आपद्ग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांचे सांत्वन

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – “पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात ओढवलेली पूर परिस्थिती गंभीर आहे. अनेकांचे जीव गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना अधिकाधिक मदत मिळायला हवी. आचारसंहिता लागू असली, तर प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या भागातील लोकांना पक्की घरे देऊन त्यांचे कायमस्वरूपी पुनवर्सन करण्याबाबत प्रयत्न करणार आहे,” असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी दिले.

रामदास आठवले यांनी अरण्येश्वर, टांगेवाला कॉलनी, आंबेडकर वसाहत, आंबीलओढा, राजेंद्रनगर येथील पूरग्रस्त भागांना भेटी देऊन नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. आचारसंहिता असली, तरी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून अधिकाधिक मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी पूरग्रस्तांना दिले. त्यांनतर पत्रकारभवन येथे रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, महिला आघाडीच्या संगीता आठवले, ऍड. अयुब शेख, ऍड. मंदार जोशी, शहर संपर्कप्रमुख अशोक कांबळे, निलेश आल्हाट, नगरसेविका हिमाली कांबळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, सचिव बाबुराव घाडगे, शाम सदाफुले, वसीम शेख, वसंत बनसोडे, मोहन जगताप यांच्यासह इतर पदाधीकारी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “टांगेवाले कॉलनी येथील बांधकाम व्यावसायिकाने येथील नागरिकांना पुनवर्सन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळलेले नाही. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत. अनेक सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांना जेवण, निवास व इतर वस्तुरूप मदत केली आहे. मात्र, अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जनावरे दगावली आहेत. अशा सगळ्या लोकांना मदत देण्यासाठी सरकार व प्रशासन प्रयत्न करील, यावर माझे लक्ष आहे.”

विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला दहा जागा हव्या आहेत. त्यामध्ये कॅंटोन्मेंट, पिंपरी, फलटण, मोहोळ, माळशिरस आदी जागांचा त्यात समावेश आहे. कमीतकमी आठ-ते नऊ जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. वंचित बहुजन आघाडीचा यावेळी फारसा प्रभाव जाणवणार नाही. त्यामुळे वंचिताना सत्ता मिळायची असेल, तर त्यांनी महायुतीसोबत यावे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर चौकशीची कारवाई होणे योग्य नाही. अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, निवडणूक तोंडावर असल्याने त्याला फार काही महत्व नाही, अशा अनेक मुद्द्यांवर रामदास आठवले यांनी पत्रकारांना उत्तरे दिली.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: