इतरक्रीडापश्चिम महाराष्ट्रपुणेयुथ कट्टाराज्यशिक्षण

एमआयटीतर्फे १४व्या राष्ट्रीय आंतर-अभियांत्रिकी‘ समिट-२०१९’ क्रीडास्पर्धेचे आयोजन

या स्पर्धेत पुण्यातील ३६ महाविद्यालये, महाराष्ट्रातून २३ व इतर राज्यातून ७ महाविद्यालयांचा सहभाग

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – दि. १० सप्टें. : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे १४वी राष्ट्रीय पातळीवरील आंतर-अभियांत्रिकी ‘समिट-२०१९’ या क्रीडास्पर्धेचे शनिवार, दि.१४ सप्टेंबर २०१९ ते बुधवार, दि.१८ सप्टेंबर २०१९ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. २००४ या वर्षापासून या स्पर्धा घेण्यात येत आहेत.

सर्वसाधारणपणे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमामुळे विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा व इतर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास अडचणी येतात. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना इच्छा असूनही व क्रीडा नैपुण्य असूनही त्यांना क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळत नाही. ही निकड दूर करण्यासाठी एमआयटी संस्था गेली १४ वर्षे समिट क्रीडा स्पर्धाचे आयोजन करत आलेली आहे. सर्वप्रथम २००४ साली स्पर्धेची सुरूवात झाली, २००७ सालापासून सातत्याने या स्पर्धोंचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून याआधी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, सुशील कुमार, विजेंदर सिंग, मेरी कोम, दिलीप वेंगसरकर, इरफान पठाण, योगेश्‍वर दत्त, चेतेश्‍वर पुजारा, भाईचुंग भुतीया, पी.आर.श्रीजेश, रेहान पोंचा, रोंजन सोधी व संदिप सिंग हे लाभले होते.

उद्घाटन समारंभ या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. १४ सप्टेंबर २०१९ रोजी सायं. ५.३० वाजता एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडांगणावर होणार आहे. या समारंभासाठी स्कायडायव्हर पद्मश्री शितल महाजन या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतीय टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले या सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे असतील.

या समारंभात क्रीडा क्षेत्रात भरीव कामगीरी केल्याबद्दल द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त रघुनंदन गोखले यांना एमआयटी डब्ल्यूपीयू क्रीडा महर्षि पुरस्कार तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त बॉक्सर मनोज पिंगळे यांना एमआयटी-डब्ल्यूपीयू क्रीडा आचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

या स्पर्धेमध्ये क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, चेस, कॅरम, स्क्वॅश, कबड्डी, वॉटर पोलो, स्वीमिंग व रोईंग अशा एकूण १५ क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी करंडक, पदके व रोख रक्कम असे एकूण १५ लाख रुपयांची बक्षिसे व प्रशिस्तीपत्रके दिली जातील. सर्व साधारण विजेत्या संघाला करंडक व ५१ हजार रुपयांचे रोख बक्षिस दिले जाईल. प्रत्येक क्रीडाप्रकारातील विजेत्या संघाला करंडक, सुवर्ण पदक व रुपये ३० हजार ते ८ हजार रोख. याखेरीज उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य पदक व रोख रक्कम रुपये १८ हजार ते ५ हजार देण्यात येणार आहे.

पारितोषिक वितरण समारंभ
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्वामी विवेकानंद सभागृहात, दि.१८ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता माईर्स एमआयटी, पुणेच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृहात होणार आहे. या समारंभासाठी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नितिन मदने व अशिया बॉडी बिल्डींग स्पर्धेमध्ये रौप्य पदक विजेता तुषार गायकवाड हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत पुणे विभागातून ३६ अभियांत्रिकी महाविद्यालये, उर्वरित महाराष्ट्रातून २३ व महाराष्ट्राबाहेरून ७ महाविद्यालयाचे एकूण ६६ महाविद्यालयांनी विविध क्रीडास्पर्धांमध्ये आतापर्यंत भाग घेतला आहे. या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मिळून एकूण सुमारे २५०० स्पर्धक भाग घेत आहेत. इतक्या व्यापक प्रमाणात खेळाडूंचा सहभाग असलेली देशातील ही एकमेव स्पर्धा आहे.

खेळाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणी आणि विश्‍वशांती हा या स्पर्धा आयोजनामागचा प्रमुख हेतू आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाखेरीज शारीरिक क्षमतेकडेही लक्ष द्यावे, अशी संयोजकांची अपेक्षा आहे. विविध क्रीडाप्रकारांमधील निष्णात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व इतर विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा ‘समिट -२०१९’ या स्पर्धेच्या आयोजनातील एक प्रमुख हेतू आहे.

अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एस. परशुराम, प्र कुलगुरू डॉ. श्रीहरी होनवाड, समिट २०१९ च्या आयोजन समितीचे विद्यार्थी प्रतिनिधी केतन कुर्तडिकर, पौर्णिमा देशमुख, ऐश्‍वर्या चौधरी व रिषभ सारस्वत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागचे अधिष्ठाता डॉ.बी.एस.कुचेकर व एमआयटी डब्ल्यूपीयूचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. पी. जी. धनवे हे उपस्थित होते.

संपण्यापूर्वी खालील ९ कुपन कोड पहा आणि ८०% पर्यंत बचत करा!

Tags

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: