इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यशिक्षण

दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी गुणांची तरतूद; आशिष शेलार यांचे प्रतिपादन

रोटरी क्लब युवा, सुपरमाईंड फाउंडेशन व रोट्रॅक्ट क्लब युवानेक्स्टतर्फे मार्गदर्शन

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – “यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने प्रात्यक्षिक परीक्षेसाठी २० गुणांची तरतूद केली आहे. या निर्णयाचे आदेश बोर्डाच्या सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी गुण देण्यात आले असले, तरी विद्यार्थ्यांनी आवश्यक प्रकल्प किंवा प्रात्यक्षिके पूर्ण करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनाने यामध्ये बदल केला आहे,” असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले.

सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे युवा आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ युवानेक्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष मागर्दर्शन सत्रात शेलार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, सुपरमाईंड फाऊंडेशनच्या संचालिका मंजुषा वैद्य, अर्चिता मडके, रोटरी क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल रवी धोत्रे, रोटरी क्लब ऑफ पुणे युवाचे अध्यक्ष राहुल गडकरी श्रीकांत जोशी, डॉ. विशाल घुले, अलोका काळे, अमेय जोग, ऋषिकेश कुलकर्णी, तृप्ती नानल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात १०२ शाळामधून ६००० विद्यार्थी व १०० हून अधिक शिक्षक व मुख्याध्यापक सहभागी झाले होते.

आशिष शेलार म्हणाले, “नववीचा कोणताही अभ्यासक्रम १० वीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला नाही. विद्यार्थ्यांनी १० वीच्या परीक्षेला आनंदाने आणि कोणतेही दडपण न घेता सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बदललेल्या अभ्यासक्रमाचे स्वरूप समजून घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, तर दहावीची परीक्षा अधिक सोपी असल्याचे आपल्याला जाणवेल. यंदाच्या परीक्षेत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याच्या तक्रारी आल्या. त्यानंतर शासनाने त्यावर विचार विनिमय करून, प्रात्यक्षिक परीक्षांत २० गुणांची तरतूद केली आहे. त्याचा येणाऱ्या वर्षात मुलांना नक्की फायदा होईल. राज्यामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा, तसेच पाण्याच्या टंचाईचा प्रश्न विद्यार्थी दशेपासून समजावा, यासाठी शासनाने जलसुरक्षा, जलशक्ती हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व समजेल आणि भविष्यत येणाऱ्या जलसंकटावर मात करू शकतील.”

मंजुषा वैद्य म्हणाल्या, “अभ्यास करताना स्व-अध्ययन गरजेचे आहे. बोर्ड, मंडळ, पाठयपुस्तक, शिक्षक, तज्ञ हेदेखील हेच सांगतात. आताच्या काळात पाठांतराला महत्व नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करण्याला व संकल्पना समजून घेण्याला प्राधान्य द्यावे. त्यातून विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढणार आहे. तसेच विद्यार्थी एखाद्या विषयाबाबत स्वतः विचार व्यक्त करतील. त्यातून त्यांची क्रयशीलता वाढेल.”

स्नेहा जोशी म्हणाल्या, “आताच्या १० वीच्या परीक्षेत ८० गुण थेअरी आणि २० गुण प्रात्यक्षिकासाठी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःचे विचार, कृती, कौशल्य निर्मितीवर भर द्यावा. विद्यार्थ्यांमधील कौशल्याना यामुळे चालना मिळणार आहे. मराठी भाषेचा अभ्यास करायचा आहे, विषयाचा नाही, हे आपण ध्यानात घ्यावे. प्रश्नावर आपले मत व्यक्त करायचे असल्याने पाठांतराचा उपयोग होणार नाही.”

डॉ. सुलभा विधाते म्हणाल्या, “अभ्यासावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः नोट्स काढणे, संपूर्ण पुस्तक वाचणे, मुद्दे काढणे, संकल्पना चित्राचा वापर करणे अशा गोष्टीं कराव्यात. आताच्या युगात इंटरनेट खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, याचा वापर गेम खेळण्यासाठी न करता आपल्या अभ्यासक्रमात असलेले विषय चलचित्र स्वरूपात पाहून त्याचा योग्य वापर करावा.”

डॉ. विशाल घुले, डॉ. जयश्री अत्रे, अच्युत सोमण यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अर्चिता मडके यांनी सुत्रसंचलन केले. आभार दीपा बडवे यांनी मानले.

शिक्षणमंत्र्यांचा थेट विद्यार्थ्यांमध्ये संवाद
व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना मेधा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांसोबत सवांद साधण्याचे आवाहन केले, त्यास होकार देत थेट विद्यार्थ्यांकडे मोर्चा वळवला. समोरच्या रांगेत बसलेल्या विद्यार्थ्यांशी हात मिळवत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना प्रोत्साहित केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. अनेकांनी त्यांच्यासोबत छायाचित्रही काढून घेतले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: