इतरपश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यशिक्षण

कर्मयोगी व कर्मयोगिनी यांची यशोगाथा म्हणजेचं विश्वात्मक सहजीवन: प्रतिभा पाटील

सिंबायोसिस विश्वभवन येथे सौ. संजीवनी मुजुमदार लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

Spread the love

महाराष्ट्र विश्व न्यूज, (पुणे) – कर्मयोगी व कर्मयोगिनी यांची यशोगाथा म्हणजे सौ. संजीवनी मुजुमदार यांनी लिहिलेले विश्वात्मक सहजीवन हे पुस्तक आहे, हे केवळ मनोरंजक नसून मनोवेधक, अर्थपूर्ण व जीवनदर्शन कादंबरी आहे असे गौरवोद्गार भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी काढले.

सोमवार, दिनांक १२ ऑगस्ट , २०१९ रोजी सिंबायोसिस विश्वभवन येथे आयोजित विश्वात्मक सहजीवन या सौ. संजीवनी मुजुमदार लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. सदर सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित होते. सिंबायोसिस चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

डॉ. प्रतिभा पाटील म्हणाल्या कि, ममता, मृदुता आणि स्त्री दाक्षिण्य यांचा सुरेख संगम आपल्याला सौ. संजीवनी मुजुमदार यांच्यात पाहायला मिळतो. सिंबायोसिस च्या जडणघडणीत सौ. संजीवनी मुजुमदार यांनी दिलेले योगदान व घेतलेले कष्ट हे वाखाणण्याजोगे आहेत. आयुष्यात अनेक अडीअडचणींचा सामना डॉ. मुजुमदार व सौ. संजीवनी यांना करावा लागला आहे, अनेकवेळा अपेक्षाभंग देखील झाला आहे तरीदेखील हिम्मत न हारता आज हे दाम्पत्य यशाच्या शिखरावरती पोचलेले आहेत. आज चा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा हा माझ्यासाठी हा कौटुंबिक कार्यक्रम च आहे असेदेखील आपल्या भाषणात त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस आपल्या भाषणात बोलताना म्हणाले कि, सहजीवनाचे आत्मचरित्र लिहिल्याचे आज प्रथमच पाहण्यात येत आहे. विश्वात्मक सहजीवन हे नवीन पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असे आहे. नवीन पिढीने चुकीच्या संकल्पना न बाळगता जीवनाची मुल्ये या पुस्तकाच्या माध्यमातून समजावून घ्यावीत. सौ. संजीवनी व सिंबायोसिस ही डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या आयुष्यातील दोन प्रमुख केंद्रे आहेत तसेच सिंबायोसिस ला वजा करून उभयतांचे सहजीवन हे पूर्ण होऊच शकत नाही. उभयतांच्या सहजीवनाचे मूल्यमापन करणे शक्य नाही, त्यांचे एकत्रित आयुष्य हे सहजीवन जगण्याचे एक उत्तम उदाहरण आहे व ते खऱ्या अर्थाने विश्वात्मक असल्याचे देखील त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले कि प्रस्तुत पुस्तक म्हणजे माझ्या पत्नीने घेतलेले संसार आणि संस्था यांचं सिंहावलोकन आहे. पुस्तक हे तिचं आत्मचरित्र आहे कि माझं चरित्र आहे का मुजुमदार कुटुंबाचा धावता इतिहास आहे हे वाचकांनी व समीक्षकांनी ठरवावे.

“कुटुंब विश्वातून विश्व कुटुंबाकडे जाणे” हि प्रक्रिया खूप आनंद देणारी आहे, सिंबायोसिस हे नाव च माझ्या जीवनाची प्रेरणा आहे. माझ्या आयुष्यात नियतीचा वाटा खूप मोठा आहे ती नेईल त्या मार्गाने माझा जीवनप्रवास झाला. नियती ही कधी जिवाशी देखील खेळते, विदारक घटना देखील नियतीने घडवून आणल्या. प्रखर विरोध आणि संघर्ष यातूनच सिंबायोसिस ची निर्मिती झाली असे देखील डॉ. मुजुमदार यांनी पुढे बोलताना सांगितले.

सदर कार्यक्रमासाठी डॉ. देवीसिंह शेखावत, डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिंबायोसिस, डॉ. स्वाती मुजुमदार, प्रधान संचालिका सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्या येरवडेकर यांनी केले, सूत्रसंचालन स्वाती दीक्षित यांनी केले तर डॉ. स्वाती मुजुमदार यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Close
%d bloggers like this: